टाटा ग्रुपमधून मोठी धक्कादायक बातमी येत आहे. टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा स्टील हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे. युरोपमधील टाटाचा प्लँट आर्थिक संकटात असून जवळपास ३००० कर्मचाऱ्यांना लवकरच नारळ दिला जाण्याची शक्यता आहे.
टाटा स्टील युकेमधील दोन ब्लास्ट फर्नेस बंद करणार आहे. हे प्लांट पोर्ट टालबोट स्टीलवर्क्समध्ये आहेत. एपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार यामुळे ३००० लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
टाटाने अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट केलेले नाहीय. परंतु आलेल्या वृत्तानुसार टाटा आज हे ब्लास्ट फर्नेस बंद करण्याची घोषणा करू शकते. वर्कर्स युनियनने देखील यावर काही भाष्य केलेले नाहीय. टाटाच्या घोषणेवेळीच कामगारांना कमी केल्याची घोषणा केली जाणार आहे.
हे प्लांट बंद करण्यासाठी कंपनीने कामगार संघटनांसोबत चर्चाही केलेली आहे. यानंतर हा निर्णय़ घेण्यात आला आहे. यामुळे कामगार संघटनाही यावर काही बोलण्यास तयार झालेली नाहीय. कंपनीला हरित धातू उत्पादनाच्या ऑपरेशनसाठी वित्तपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. ऑपरेशनल समस्यांमुळे हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाऊ शकते.
ब्रिटिश सरकार कंपनीचे कामकाज चालू ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यापासून वाचवण्यासाठी सरकारी मदत पुरवत होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस सरकारने युनिटला सुमारे 5,300 कोटी रुपयांची मदत केली होती. तरीही टाटाने हा निर्णय घेतला आहे.