Tesla Tata Deal: इलॉन मस्क यांची कंपनी टेस्ला आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांच्यात स्ट्रॅटजिक करार झाला आहे. टेस्लानंटाटा इलेक्ट्रॉनिक्सकडून त्यांच्या कारसाठी सेमीकंडक्टर चिप्स खरेदी करण्यासाठी हा करार केलाय. टाटा इलेक्ट्रॉनिक्सला टॉप ग्लोबल क्यायंट्ससाठी एक विश्वासार्ह सप्लायर म्हणून पुढे येण्यास हा करार मदत करणार असल्यानं तो अतिशय महत्त्वपूर्ण असेल. हा करार काही महिन्यांत पूर्ण होईल.
इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी टेस्ला ही जगातील आघाडीची कंपनी भारतात येऊ इच्छित आहे. भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी ऑटोमोटिव्ह बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क या महिन्यात पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी भारतात येणार आहेत. मस्क यांच्या भारत भेटीमुळे टेस्लाच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होण्याचीही अपेक्षा आहे.
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार टाटा इलेक्ट्रॉनिक्स (Tata Electronics) आणि टेस्ला (Tesla) यांच्यातील डीलच्या रकमेबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. या करारावर दोन्ही कंपन्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सूत्रांनी या डीलसंदर्भातील माहिती दिली आहे. इंडियन इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक चांडक यांनी यावर प्रतिक्रिया दिली. टेस्लाच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या स्थानिक सप्लायर्ससाठी एक इकोसिस्टम निर्माण होईल. यावरुन आता ते एखाद्या विशिष्ट बाजारपेठेवर अवलंबून नाही हे दिसून येत असल्याचं त्यांनी म्हटलं.
अनेक उद्योग तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की टेस्ला भारतात किमान २ ते ३ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह ईव्ही तयार करेल. टेस्ला भारतात आपला उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारू शकते, असंही वृत्त समोर आलंय.