टाटा समूहाची उपस्थिती अनेक व्यावसायांमध्ये आहे. आता ते ऑनलाइन फूड ऑर्डर क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, आता टाटा ग्रुपचे सुपर ॲप - टाटा नियू (Tata Neu) यासाठी तयारी करत आहे. टाटा नियू ONDC (Open Network for Digital Commerce) द्वारे झोमॅटो (Zomato) आणि स्विगीशी (Swiggy) स्पर्धा करण्याची तयारी करत आहे.
एका सूत्रानुसार, पुढील काही दिवसांत हे अॅप काही युझर्ससाठी सुरू केले जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुढील काही महिन्यांमध्ये ते सर्वांसाठी उपलब्ध केलं जाऊ शकतं. मनी कंट्रोलनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. यावर केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर कपडे, दागिने, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींचीही विक्री केली जाईल, इतकंच नाही तर विमानाचं तिकिटही तुम्हाला बुक करता येईल.
कशी करणार स्पर्धा?
सध्या टाटा या अॅपद्वारे खाद्यपदार्थांच्या ऑर्डर दिल्या जात नाहीत, असं नाही. मात्र, या ॲपच्या फूड कॅटेगरीमध्ये गेल्यावर त्यावर फक्त टाटा ग्रुपच्या ताज ब्रँड हॉटेल कंपनीच्या रेस्टॉरंट्सचा मेन्यू दिसतो. आता ओएनडीसीच्या माध्यमातून शहरातील रेस्टॉरंट्सही या ॲपवर दिसतील आणि तेथून तुम्ही तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ मागवू शकता. सध्या या मार्केटमध्ये स्विगी आणि झोमॅटोचा ९५ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे आणि आर्थिक वर्ष २०२३ मध्ये सुमारे ६०० कोटी डॉलर्स किमतीच्या एकूण ऑर्डर्सची सेवा पुरवली आहे.