Join us

Tata उभारणार देशातील पहिला AI-अनेबल्ड पॉवरचिप सेमीकंडक्टर प्लांट, ९१००० कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:00 PM

याद्वारे अनेक प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष नोकऱ्याही निर्माण होणार आहेत.

India's First AI-Enabled Powerchip Semiconductor Plant: भारतात स्वदेशी सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारत सरकारनं टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या गुजरातमधील मेगा सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा (फॅब) तयार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यावर्षी एकूण ९१,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह फॅबची उभारणी सुरू होईल आणि याद्वारे २० हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील. या घोषणेसह, टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं जागतिक सेमीकंडक्टर उद्योगात प्रवेश केला आहे. 

पहिला AI-अनेबल्ड पॉवरचिप सेमीकंडटर प्लांट 

टाटा इलेक्ट्रॉनिक्स, पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनसह (PSMC) भागीदारीत भारतातील पहिला AI-अनेबल्ड अत्याधुनिक फॅब उभारेल. फॅबची उत्पादन क्षमता दरमहा ५०,००० इतकी असेल आणि त्यात नेक्स्ट जनरेशन फॅक्टरी ऑटोमेशन क्षमतांचा समावेश असेल ज्यामध्ये डेटा ॲनालिटिक्स आणि इंडस्ट्रीची सर्वोत्तम फॅक्टरी कार्यक्षमता साध्य करण्यासाठी मशीन लर्निंगचाही समावेश असेल. नवीन सेमीकंडक्टर फॅब ऑटोमोटिव्ह, कम्प्युटिंग आणि डेटा स्टोरेज, वायरलेस कम्युनिकेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सारख्या मागणीकडे पाहता आयसीज, मायक्रोकंट्रोलर आणि कम्प्युटिंग लॉजिक्ससाठी चिप्स तयार करेल. 

२०३० पर्यंत हे आहे प्लॅनिंग 

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी जानेवारी २०२४ मध्ये २० व्या व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये धोलेरा येथे सेमीकंडक्टर फॅब उभारण्याचा टाटा समूहाचा निर्णय जाहीर केला होता. २०३० पर्यंत जागतिक सेमीकंडक्टर उद्योग १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. तर भारतातील सेमीकंडक्टरची मागणी ११० अब्ज डॉलर्सची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. येत्या काळात सेमीकंडक्टर उद्योगात भारत एक अतिशय महत्त्वाचा प्लेयर बनेल.

टॅग्स :टाटागुजरात