Join us  

Ratan Tata : रतन टाटांचे चार विश्वासू शिलेदार; त्यांच्याकडेच दिलेत संपत्तीच्या वाटणीचे अधिकार! जाणून घ्या कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:14 PM

Ratan Tata Will : आता रतन टाटांच्या इच्छेनुसार घेतलेले निर्णय पूर्ण करावा लागणार आहेत. त्यांच्या इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ratan Tata Will : वर्षानुवर्षे टाटा समूहाचे (Tata Group) नेतृत्व करणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (Noel Tata) यांची टाटा ट्रस्टचे (Tata Trust) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता रतन टाटांच्या इच्छेनुसार घेतलेले निर्णय पूर्ण करावे लागणार आहेत. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, रतन टाटा यांनी इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी वकील डेरियस खंबाटा, त्यांचे निकटवर्तीय मेहली मिस्त्री (Mehli Mistry) आणि त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन (Shireen) आणि डेना जेजीभॉय (Deanna Jejeebhoy) यांची नियुक्ती केली आहे.

टाटा सन्सशिवाय 'या' कंपन्यांमध्ये हिस्सा

हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४ च्या रिपोर्टनुसार टाटा सन्समध्ये रतन टाटा यांची ०.८३ टक्के हिस्सा होता. त्यांची नेटवर्थ ७९०० कोटी रुपये होती. रतन टाटा यांच्या संपत्तीपैकी तीन चतुर्थांश संपत्ती टाटा सन्समधील त्यांच्या शेअर्शी संबंधित आहे. याशिवाय रतन टाटा यांनी ओला, पेटीएम, ट्रॅक्सन, फर्स्टक्राय, ब्लूस्टोन, कारदेखो, कॅशकारो, अर्बन कंपनी, अपस्टॉक्स अशा जवळपास २ डझन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. याशिवाय मुंबईतील कुलाबा आणि अलिबाग येथे त्यांची घरं होती. रतन टाटा यांच्या इच्छापत्राचा तपशील खासगी आहे.

कोण आहेत मेहली मिस्त्री?

मेहली मिस्त्री रतन टाटा यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मेहली हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. टाटा सन्समध्ये दोन्ही ट्रस्टची मिळून ५२ टक्के हिस्सेदारी आहे. तर, टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा एकूण ६६ टक्के हिस्सा आहे. टाटा सन्स ही टाटा समूहाची होल्डिंग कंपनी आहे. टाटा समूहातील लिस्टेड कंपन्यांमध्ये टाटा सन्सचं बाजारमूल्य १६.७१ लाख कोटी रुपये आहे.

डेरियस खंबाटांची मदत

रिपोर्टनुसार, डेरियस खंबाटा यांनी रतन टाटा यांना इच्छापत्र तयार करण्यात मदत केली आहे. गेल्या वर्षी ते दोन प्रमुख ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून परतले. यापूर्वी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव टाटा ट्रस्टची साथ सोडली होती.

टॅग्स :रतन टाटाव्यवसायनोएल टाटा