टाटा कंपनी मोबाईल निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. सध्या टाटा अॅप्पल या दिग्गज कंपनीचे स्मार्टफोन बनवत आहे. असे असले तरी टाटा व्हिवोचा भारतातील हिस्सा विकत घेणार होती. परंतू, अॅप्पलने विरोध केल्याने टाटाला ही डील सोडावी लागली आहे.
व्हिवोचा गेल्या आर्थिक वर्षातील महसूल ३० हजार कोटी रुपये आहे. व्हिवो ही चीनची कंपनी आहे. यामुळे भारत सरकारने या कंपनीवर बिझनेसचे नियंत्रण भारतीय कंपनीकडे देण्यासाठी दबाव टाकला आहे. यामुळे व्हिवो भारतातील व्यवसायाचा ५१ टक्के हिस्सा टाटा कंपनीला विकण्याची तयारी करत होती. परंतू, अॅप्पल कंपनीने यावर आक्षेप नोंदविला असून यामुळे टाटाने ही डील बाजुला सारली आहे.
टाटा कंपनी अॅप्पलचे मोबाईल भारतात बनवत आहे. यामुळे व्हिवो ही स्पर्धक कंपनी असल्याने अॅप्पलने टाटाच्या डीलवर आक्षेप घेतला होता. यामुळे टाटा आणि व्हिवोमधील डीलवरील चर्चा तुटल्याचे या विषयाशी संबंधीत सुत्रांनी सांगितले आहे. यावर पुनर्विचार करण्याची शक्यताही खूप कमी असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. व्हिवो आणि अॅप्पलला टाईम्स ऑफ इंडियाने काही प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरे आलेली नाहीत. तर टाटाने असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे.
भारत सरकारच्या दट्ट्यामुळे चीनच्या कंपन्या स्थानिक भारतीय भागीदार शोधत आहेत. सरकार शेजारी देशांनी केलेल्या गुंतवणुकीची कठोर तपासणी करत आहे. यामुळे चिनी कंपन्यांच्या अडचणी वाढत आहेत. भारतीय कंपनी सोबत असल्यास मेक इन इंडियाचा फायदा उचलता येणार आहे. यामुळे कारवाईपासून वाचण्यासाठी चिनी कंपन्या अशा डील करण्याच्या विचारात आहेत.
याच प्रयत्नातून चीनच्या मालकीची झालेली एमजी मोटर्स कंपनीने जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत भागीदारी करत भारतातील व्यवसाय विकला आहे. डिक्सन इलेक्ट्रॉनिक्सने देखील इस्मार्टू इंडियामध्ये ५६ टक्के भागीदारी खरेदी करण्याची डील केली आहे. इस्मार्टू ही चीनची ट्रांसन टेक्नोलॉजीची उपकंपनी आहे. या कंपनीकडे आयटेल, इन्फिनिक्स, टेक्नोसारखे ब्रँड आहेत.