मुंबई - ज्या एअरलाईन्सचा जेआरडी टाटांनी ८८ वर्षांपूर्वी पाया घातला होता, ती पुन्हा टाटा होणार असल्याचं दिसून येत आहे. अडचणीत आलेल्या एअर इंडियासाठी १७ मार्चपर्यंत निविदा मागविण्यात आल्या आहेत आणि टाटा समूह या नॅशनल कैरियरसाठी आपली दावेदारी अंतिम करण्याच्या स्थितीत आहे. टाटा समूह सिंगापूर एअरलाइन्सच्या सहकार्याने एअर इंडियासाठी बोली लावण्याच्या तयारीत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी मिळून ही बोली लावण्यासाठी काम सुरू केले आहे.
१९३२ मध्ये जेआरडी टाटाने एअर इंडियाचा पाया रचला होता आणि १९४६ मध्ये त्याचे राष्ट्रीयकरण झाले. सुरुवातीला ते टाटा एअरलाइन्स म्हणून ओळखले जात होते, राष्ट्रीयकरणानंतर १९४८ मध्ये त्याला एअर इंडिया असं नाव देण्यात आले. आता ही विमान कंपनी पुन्हा एकदा टाटाच्या समुहात परतू शकते. टाटा ग्रुप एअर इंडिया विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामध्ये एअर एशिया इंडियाचे विलीनीकरण (टाटाचे यात 51% भागभांडवल आहे) आणि एअर इंडियाची 100% उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसचा समावेश आहे.
टाटा समूहाने एअर एशियामध्ये 49% भागधारक असलेल्या मलेशियन उद्योजक टोनी फर्नांडिस यांच्याकडेही संपर्क करुन एअर इंडिया एक्स्प्रेस खरेदी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. भागधारक करारानुसार फर्नांडिस तयार नसल्यास टाटा समूह अन्य कोणत्याही एअरलाईन्समध्ये 10% पेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच नवीन करारावर स्वाक्षऱ्या होऊ शकतात. टाटा समूहाने एअर एशिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे विलीनीकरण प्रस्ताव तयार केला आहे. या विलीनीकरणामुळे फर्नांडिसचा भारतीय विमानचालन क्षेत्रातील मोठा वाटा होईल, त्यामुळे दोन्ही पार्टनरचा विजय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
टाटा ग्रुप आणि फर्नांडिस यांच्या संयुक्त विद्यमाने २०१३ मध्ये एअर एशियाची सुरूवात झाली. टाटा आणखी एक पूर्ण-सेवा वाहक विस्तारा चालवते, जी सिंगापूर एअरलाइन्ससोबत संयुक्त भागीदारीमध्ये आहे. टाटा समूहाचा यामध्ये 51% हिस्सा आहे. नुकतेच टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले होते की, "विलीनीकरण केल्याशिवाय आम्ही तिसरे विमान चालवू शकत नाही". एअर इंडिया आणि विस्तारा यांच्यासमवेत टाटा समूहाला फुल सर्व्हिस स्पेसमध्ये मक्तेदारी मिळू शकेल.
एअर एक्सप्रेस आणि एअर एशिया कुठे आहेत?
एअर इंडिया एक्सप्रेसने 20 भारतीय शहरांमध्ये उड्डाण केले. याव्यतिरिक्त, आखाती देश आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये 13 आंतरराष्ट्रीय गंतव्य स्थानांवरही त्याचे अस्तित्व आहे. त्यांच्या ताफ्यामध्ये 25 बोईंग 737 आहेत, तर एअर एशियाच्या बाबतीत त्यात 29 एअरबस ए 320 आहे आणि ते 21 शहरांमध्ये सेवा देतात.
परदेशी उड्डाणांच्या मंजुरी मिळण्यास अडचणी
एअर एशिया इंडिया परदेशी उड्डाणांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. एअर एशिया बोर्डावरील फर्नांडिस, टाटा नॉमिनी आर. वेंकटरामन यांच्यावर गुन्हेगारी खटले आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरण सुरु आहेत. फर्नांडिस यांना ५ फेब्रुवारी रोजी ईडीने समन्स बजावले.