ऑनलाइन लोकमत
जिनिव्हा, दि. 8 - जगभरातील कारप्रेमींसाठी जिनिव्हा येथे सुरू असलेला 'इंटरनॅशनल मोटार शो 2017' एक पर्वणीच आहे. जगभरातील अग्रगण्य कंपन्या यामध्ये सहभागी होत आहेत. भारतीय कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे. भारतातील आघाडीची कार निर्माती कंपनी टाटा मोटर्सने आपला सब-ब्रॅंड TAMO ची पहिली-वहिली स्पोर्ट्स कार 'Racemo' प्रदर्शित केली. Racemo ची पहिली झलक दिसल्यापासूनच कारप्रेमींना 'याड' लागलंय. 2017 इंटरनॅशनल मोटार शोमध्येही ही कार सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली.
2018 च्या सुरूवातीला या कारचं प्रोडक्शन व्हर्जन भारतात लॉन्च केलं जाईल. ही टू- सीटर स्पोर्ट्स कार असून भारताची पहिली कनेक्टेड कार आहे.
कनेक्टेड कार असल्याने यामध्ये मायक्रोसॉफ्टचं तंत्रज्ञान असणार आहे. याशिवाय क्लाउड कम्प्यूटिंग, अॅनालिटिक्स, जियो स्पाटिशियल आणि मॅपिंग यांसारखे फीचर्स या कारमध्ये दिले आहेत.
Racemo ची बॉडी टाटाच्या MOFlex मल्टीमटेरिअल सॅंडविच स्ट्रक्चरपासून बनवण्यात आली आहे. पॅसेंजर गाडीमध्ये हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच देण्यात आलंय.
जगभरातील इतर स्पोर्टस् गाड्यांप्रमाणेच यामध्ये रिअर माउंटेड मिड इंजिन ले-आउट देण्यात आलं आहे.
गाडीमध्ये 1.2 लीटरचं टर्बोचार्ज्ड रेवोट्रोन पेट्रोल इंजिन असून ते 186 hp पावर आणि 210 Nm च्या टार्कची निर्मीती करतं.
ट्रान्समिशनसाठी यामध्ये पॅडल शिफ्टरसह सिक्स स्पीड AMT यूनिट देण्यात आलं आहे.
या कारची किंमत किती असणार आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.