मुंबई : २३ नोव्हेंबर २०११, बुधवारच्या संध्याकाळी सहाच्या सुमारास, टाटा समूहाला नवीन उत्तराधिकारी मिळाल्याची बातमी देशात आणि जगाला आश्चर्यचकित करणारी होती. विशेष म्हणजे भविष्यातील प्रमुख हा टाटा कुटुंबाचा नसून, बाहेरचा व्यक्ती होता. त्यानंतर काही तासांत ४३ वर्षीय सायरस पालनजी मिस्त्री यांच्या नावाला जगात नवी ओळख मिळाली.
गुंतवणूकदारांना केले मालामालसायरस मिस्त्री हे ७३ वर्षीय रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित होताच टाटा समूहाच्या कंपन्यांच्या समभागांनी मोठी उसळी घेतली आणि एकाच दिवशी कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे ५२ अब्ज रुपयांची वाढ झाली होती.
दिखावूपणा टाळलाटाटा समूहाचे सर्वेसर्वा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सायरस मुंबईतील टाटा मुख्यालय बॉम्बे हाऊसमध्ये आले तेव्हा ते साध्या पँट-शर्टमध्ये होते, तर त्यांचे स्वागत करणारे लोक सूट-बूट घालून आले होते. त्याच्या शर्टच्या बाह्या दुमडलेल्या होत्या आणि काही बटणे उघडी होती.
जगात शोधाशोध अन्...- रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडणे हे टाटा सन्ससाठी अवघड काम होते. सदस्यांनी योग्य व्यक्तीच्या शोधात जगभर प्रवास केला. इंद्रा नुयी यांच्यासह इतर १४ जणांमध्ये यासाठी स्पर्धा होती. - या सर्वांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, त्यानंतर सर्वानुमते सायरस यांची निवड करण्यात आली. सायरस हे नोएल टाटा यांचे मेहुणे होते.
टाटांसोबत नेमके नाते काय होते? - व्यावसायिक नात्यांसोबतच मिस्त्री आणि टाटा कुटुंबाचे कौटुंबिक संबंध देखील आहेत. उद्योगपती पालनजी शापूरजी यांना शापूर आणि सायरस मिस्त्री अशी दोन मुले. - तर लैला आणि अल्लू या दोन मुली आहेत. पालनजी शापूरजी यांची मुलगी अल्लू यांचे लग्न नोएल टाटा यांच्याशी झाले आहे. - नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. या विवाहामुळे सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यात कौटुंबिक नाते संबंध वाढत गेले.
संपत्ती किती? २०१८ मध्ये सायरस यांची एकूण संपत्ती ७०,९५७ कोटी रुपये होती. ते पत्नी रोहिका छागला यांच्यासोबत मुंबईतील एका आलिशान घरात राहत होते. मुंबईसह आयर्लंड, लंडन आणि दुबईमध्येही त्यांचे निवासस्थान आहे.
सेलिब्रिटींच्या गर्दीत सर्वांत वेगळे आणि सामान्यसेलिब्रिटींच्या मुलांमध्ये ते सहज ओळखले जात. ते चकाकणाऱ्या गाडीने भलेही शाळेत जात असले, तरी वर्गात अगदी सामान्य वागायचे आणि अभ्यासात गंभीर होते. ते प्रसिद्धीपासून दूर राहत देशाच्या विकासात योगदान देत होते.
विक्रमांवर विक्रम...- सायरस यांचा जन्म ४ जुलै १९६८ रोजी मुंबईत झाला. मुंबई, लंडन येथे शिक्षण घेतल्यानंतर १९९१ मध्ये कुटुंबाच्या व्यवसायात लक्ष देत मोठा फायदा मिळवून दिला.
- १९९४ मध्ये त्यांची कंपनीच्या संचालकपदी निवड झाली. वडिलांप्रमाणेच त्यांनी भारतात अनेक विक्रम केले. यामध्ये सर्वात उंच निवासी टॉवर, सर्वात लांब रेल्वे पूल आणि सर्वात मोठ्या बंदराचे बांधकाम त्यांच्या कंपनीने केले.
- मलबार हिल जलाशय या कंपनीने बांधला होता. ताज इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भवन आणि एचएसबीसी भवन, ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई आणि जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दिल्लीदेखील त्यांनी बांधले आहे. सायरस यांनी कंपनीचा जगभरात विस्तार केला.
पाय जमिनीवर ठेवले : गेल्या अनेक दशकांपासून प्रसिद्धीच्या झोतात असूनही, रतन टाटा यांचे व्यक्तिमत्त्व हे जमिनीवर पाय असल्यासारखे आहे. त्याचप्रमाणे सायरस मिस्त्री यांना जवळून ओळखणारे ते अगदी रतन टाटा यांच्यासारखेच आहेत असे म्हणायचे. दोघांच्या स्वभावात आणि विशेषत: लोकांना भेटण्याच्या सवयीत बरेच साम्य होते.
सायरस यांच्याबाबत टाटा काय म्हणाले होते? : सायरस यांच्या नियुक्तीवर रतन टाटा म्हणाले होते की, ‘टाटा सन्सच्या उपाध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांची निवड हा एक चांगला आणि दूरदृष्टीचा निर्णय आहे. ते २००६ पासून टाटा सन्सच्या संचालक मंडळावर आहेत आणि त्यांचे गुण, त्यांची सहभाग घेण्याची क्षमता, चतुराई आणि नम्रता पाहून मी प्रभावित झालो.
मिस्त्री यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आणि निःशब्द करणारे आहे. देशातील एका मोठ्या उद्यमशील घराण्यात जन्मून आपल्या कर्तव्य व व्यवसाय कुशलतेने त्यांनी भारतीय उद्योगविश्वात आपला ठसा उमटवला होता. - भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही देशातील उद्योगविश्वाची मोठी हानी आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
उद्योगांच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सायरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात झालेले निधन धक्कादायक आहे. महामार्गांवर वेगमर्यादा कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज यानिमित्तान पुन्हा एकदा समोर आली आहे. - शरद पवार, राष्ट्रवादी
सायरस मिस्त्री यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष व माझे बंधुतुल्य सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला. मिस्त्री कुटुंबाशी आम्हा सर्वांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी.
सायरस यांच्या आकस्मिक आणि अकाली निधनाने मला खूप दुःख झाले आहे. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबासाठी माझ्या मनापासून संवेदना. - एन चंद्रशेखरन, अध्यक्ष, टाटा सन्स
रस्ते अपघातात या दिग्गजांचा अकाली अंत -प्रिन्सेस डायना, पॉल वॉकर, जसपाल भट्टी, रेखा सिंधू, नंदामुरी हरिकृष्ण, यशो सागर