Join us

सायरस मिस्त्रींच्या पत्रामुळे टाटाचे शेअर्स पुन्हा गडगडले

By admin | Published: October 27, 2016 10:51 AM

गुरुवारी सकाळी शेअर बाजार उघडताच टाटा समूहातील कंपन्यांचे शेअर पुन्हा एकदा गडगडले. टाटा समूहातील जवळपास सर्व कंपन्यांचे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांनी घसरले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - १00 अब्ज डॉलरच्या टाटा उद्योग समूहाचे चेअरमन सायरस मिस्त्री यांना पदावरून तडकाफडकी दूर करण्यात आल्याचा परिणाम शेअर्सवर झालेला दिसत आहे. मंगळवारी शेअर्स गडगल्यानंतर सायरस मिस्त्रींच्या पत्रामुळे गुरुवारी पुन्हा एकदा टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम झालेला दिसला. गुरुवारी सकाळी शेअर बाजार उघडताच टाटा समूहातील कंपन्यांचे शेअर पुन्हा एकदा गडगडले. टाटा समूहातील जवळपास सर्व कंपन्यांचे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांनी घसरले आहेत.
 
(सायरस मिस्त्रींना ‘टाटा’)
(टाटा समूहाचे चेअरमनपद पुन्हा रतन टाटांकडे)
 
सकाळी भांडवली बाजाराच्या व्यवहारांना सुरूवात झाल्यानंतर सेन्सेक्स १०० तर निफ्टी तब्बल ३० अंशांनी खाली आला होता. 
मंगळवारी सकाळी शेअर बाजार उघडताच टाटा समुहातील कंपन्यांचे शेअर्स 3 ते 5 टक्क्यांनी घसरले होते. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टीसीएस, टाटा कम्युनिकेशन, बेवरेजच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. सायरस मिस्त्रींना हटवल्यानंतर अनिश्चिततेचे वातावरण असल्याचं दिसत आहे. 
 
 
नफ्यात नसलेल्या उद्योगांमध्ये टाटा समूहातील कंपन्यांची मोठया प्रमाणावर गुंतवणूक आहे त्यामुळे १ लाख १८ हजार कोटींवर पाणी सोडावे लागू शकते असे सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या संचालक मंडळातील सदस्यांना पाठवलेल्या कथित पत्रात म्हटले आहे. हे पत्र फुटले असून त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आपण समूहाची सूत्रे स्वीकारल्यानंतर  टाटा सन्सची जी कलमे त्यात बदल करण्यात आला त्यामुळे आपल्याला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले नाही. या बदलांमुळे चेअरमनकडे असणारे अधिकार कमी झाले असा आरोप मिस्त्री यांनी केला आहे. चेअरमनला आपली बाजू मांडू न देता तुम्ही पदावरुन हटवले. कॉर्पोरेट इतिहासातील हा असा एकमेव निर्णय असेल. 
 
सोमवारी चेअरमन पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर गप्प राहिलेल्या सायरस मिस्त्री यांनी लगेच दुसऱ्या दिवशी, २५ आॅक्टोबर रोजी, टाटा समूहाची नियामक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या संचालकांना, रात्री १० वाजता ई-मेलने पाठविलेले पाचपानी गोपनीय पत्र बुधवारी विविध माध्यमांतून उघड झाले. या पत्राची भाषा पाहता, मिस्त्री यांनी केवळ आपली बाजू मांडण्यासाठी नव्हे, तर भविष्यातील संभाव्य न्यायालयीन लढ्याची भक्कम पृष्ठभूमी तयार करण्यासाठी हे पत्र मातब्बर वकिलांचा सल्ला घेऊन लिहिले असावे, असे मानले जात आहे.
 
 
मिस्त्री पत्रात म्हणतात की, सन २०११ मध्ये चेअरमनपदासाठी शोध घेऊनही कोणी लायक उमेदवार न मिळाल्याने रतन टाटा व लॉर्ड भट्टाचार्य यांनी आपल्याला हे पद स्वीकारण्याची गळ घातली. सुरुवातीस माझी तयारी नव्हती. परंतु नंतर टाटा समुहाच्या व्यापक हितासाठी मी तयार झालो.
 
४८ वर्षीय मिस्त्री यांनी चार वर्षांपूर्वी ७८ वर्षीय रतन टाटा यांच्याकडूनच ‘टाटा सन्स’ या ‘टाटा समूहा’च्या होल्डिंग कंपनीच्या चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला होता. मिस्त्री यांना पदावरून तातडीने काढण्यामागील कारण जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, मिस्त्री यांच्या कामावर ‘टाटा सन्स’ समाधानी नव्हती. नफ्यात नसलेल्या उद्योगांकडे त्यांचे लक्ष नव्हते, असे समजते. मिस्त्री यांना पदमुक्त केल्याची माहिती रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळवली आहे. ‘टाटा’ला स्थैर्य देण्यासाठी सध्या पद स्वीकारल्याचे ते म्हणाले. 
 
04/07/1968 रोजी जन्मलेल्या सायरस मिस्त्री यांनी लंडनमधील इंपेरियल कॉलेज आॅफ सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मेडिसिनमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबीए केले. पण, टाटा समूहाला पुढे नेण्यात ते कमी पडले, असे बोलले जात आहे. नोव्हेंबर 2011मध्ये सायरस मिस्त्री यांची टाटांचे वारसदार म्हणून डेप्युटी चेअरमनपदी नेमणूक करण्यात आली होती.