गेल्या आठवड्यात टाटा ग्रुपच्या विस्तारा एअरलाईनने १०० च्या वर फ्लाईट अचानक रद्द केल्या आणि प्रवाशांत एकच खळबळ उडाली होती. यामुळे नागरी उड्डाण मंत्रालयाने टाटाच्या विस्तारा एअरलाईनकडून उत्तर मागितले आहे. टाटाने एअर इंडियाला विकत घेतले आहे. तसेच त्यांची विस्तारा ही एअरलाईन देखील सुरु आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या आठवड्यात विस्ताराची १०० हून अधिक उड्डाणे रद्द आणि विलंबाने उडाली होती. तसेच आजही एअरलाईन्सची ७० हून अधिक फ्लाईट रद्द होऊ शकतात. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार दिल्लीच्या पाच फ्लाईट, बंगळुरुच्या तीन, कोलकाताच्या दोन फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. पायलट नसल्याने आणि संचालनामध्ये समस्या असल्याने विस्तारा काम करू शकत नसल्याचे समोर येत आहे. गेल्या काही काळापासून विस्तारा क्रू मेंबरच्या कमतरतेमुळे झगडत आहे. विस्ताराच्या प्रवक्त्याने देखील हे मान्य केले आहे. विस्ताराचे कर्मचारी नवीन करारामध्ये पगारात कपात झाल्याने विरोध करत आहेत. यामुळे पुरेशा प्रमाणावर कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. याचा परिणाम फ्लाईटवर होत असून त्या रद्द कराव्या लागत आहेत.
यामुळे कंपनीने तात्पुरत्या काळासाठी फ्लाईट रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे. पुढील काही काळ देखील विमाने रद्द केली जाणार असून, एअरलाईन देत असलेल्या ठिकाणांवरील सेवा पुरेशा प्रमाणावर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.