नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते आॅगस्ट या पहिल्या पाच महिन्यांच्या काळात करवसुलीत मोठी वाढ झाली आहे. अप्रत्यक्ष करांची वसुली २७.५ टक्के, तर प्रत्यक्ष करांची वसुली १५.0३ टक्क्यांनी वाढली. सरकारी सूत्रांनी सांगितले की, २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १६.२६ लाख कोटी करवसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पहिल्या पाच महिन्यांत त्यापैकी तिसरा हिस्सा कर वसूल झाला आहे. यंदा संपूर्ण आर्थिक वर्षात थेट करात १२.६४ टक्के म्हणजेच ८.४७ लाख कोटींची वाढ सरकारला अपेक्षित आहे. अप्रत्यक्ष करात १0.८ टक्क्यांची अथवा ७.७९ लाख कोटींची वाढ अपेक्षित आहे. वैयक्तिक आयकर आणि अबकारी करात मोठी वाढ झाल्याने यंदाची वसुली वाढली आहे. प्रत्यक्ष करांची एकूण वसुली १.८९ लाख कोटींवर गेली आहे, तसेच अप्रत्यक्ष करांची वसुली ३.३६ लाख कोटींवर गेली आहे. प्रत्यक्ष करात कॉर्पोरेट आणि वैयक्तिक आयकराचा समावेश होतो, तर अप्रत्यक्ष करात अबकारी, सेवाकर आणि सीमा शुल्क यांचा समावेश होतो. कॉर्पोरेट आयकर ११.५५ टक्क्यांनी, तर वैयक्तिक आयकर २४.0६ टक्क्यांनी वाढला. रिफंड काढल्यानंतर कॉर्पोरेट आयकराची वाढ मात्र उणे (-) १.८९ टक्क्यांवर गेली. वैयक्तिक आयकर मात्र ३१.७६ टक्क्यांवर गेला. अबकारी कर ४८.८ टक्के वाढून १.५३ लाख कोटी झाला. सेवाकर २३.२ टक्क्यांनी वाढून ९२,६९६ कोटी झाला. याच काळात सीमा शुल्काची वसुली ९0,४४८ कोटी झाली.