- अजित जोशी, (चार्टर्ड अकाउंटंट)प्रश्न : आपल्याला मिळणाऱ्या भेटीवर कसे कर लावले जातात?उत्तर : गिफ्ट अर्थात भेट ही वेगवेगळ्या प्रकारे मिळू शकते. मात्र, कोणत्याही पद्धतीने ती जर नातेवाईकांनी दिलेली असेल तर संपूर्णपणे करमुक्त असते. यात नातेवाईक म्हणजे आई-वडील, मुलं, त्यांचे पूर्वज अगर वारस, भाऊ, बहीण, नणंद/दीर, मेव्हणी/मेव्हणा आणि या सगळ्यांचे पती/पत्नी येतात. यापैकी कोणाकडूनही आलेली भेट करमुक्त आहे. त्याचप्रमाणे लग्नात आलेलीही भेट, मग ती कोणाकडूनही किंवा काहीही असली तरी करमुक्त असते. यात एक लक्षात ठेवायला हवं. सून किंवा पती/पत्नीला अशाप्रकारे काही भेट दिली, तर घेणाऱ्याला ते करमुक्त आहे, हे खरं आहे. पण त्या भेटीवर जे उत्पन्न जमतं ते मात्र भेट देणाऱ्याच्या उत्पन्नात वाढवलं जातं…
याशिवाय जर रक्कम किंवा वस्तूरूपात म्हणून सर्वांकडूनच मिळालेली भेट रुपये ५० हजारच्या आत असेल तर तीही करमुक्त असते. मात्र, ५० हजार रुपयांहून जास्त असेल, तर मात्र संपूर्णपणे त्यावर कर लागतो. त्याचप्रमाणे सवलतीच्या दरात भेट म्हणून कोणी वस्तूरूपात देत असेल आणि वस्तूच्या योग्य मूल्यापेक्षा सवलत ५० हजार रुपयांहून जास्त असेल तरी अशा सवलतीला करपात्र उत्पन्न मानलं जातं. प्रश्न : मी खरेदी करत असलेल्या घराचा व्यवहार स्टॅम्प ड्युटीपेक्षा कमी किमतीला होतो आहे. त्याने काय फरक पडेल?उत्तर : तुमच्या व्यवहाराची रक्कम ५० लाख रुपये धरू. जर स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांकाच्या नियमानुसार येणारी रक्कम जर ५० लाख रुपये अधिक दहा टक्क्यांहून म्हणजेच ५५ लाखांहून कमी असेल, तर प्रश्नच नाही. पण मुद्रांकाच्या नियमानुसार येणारी किंमत त्याहून जास्त, म्हणजे समजा रुपये ५७ लाख आहे. तर हे मूल्य आणि व्यवहाराची रक्कम म्हणजे रुपये ५० लाख यातला फरक, अर्थात रुपये ७ लाख, हे खरेदी करणाऱ्याचं उत्पन्न मानलं जाईल. याशिवाय विकणाऱ्याला आपल्याला विक्रीतून मिळालेली रक्कम ५७ लाखच धरावी लागेल, ते वेगळं!।म्हणूनच स्टॅम्प ड्युटीच्या नियमानुसार असणाऱ्या रकमेएव्हढी तरी व्यवहाराची रक्कम असली तर उत्तम!- काही कारणाने मात्र खरोखरच विक्रीची किंमत खूप कमी असेल तर आधीच करखात्याला अर्ज करून अशाप्रकारे स्टॅम्प ड्युटीनुसार येणारं मूल्य काही वाजवी नाही. - कोणताही खरेदीदार त्या किमतीला व्यवहार करत नाहीये. सबब आपल्याला कमी रकमेला व्यवहार करूनही काहीही रक्कम उत्पन्नात वाढवू नये, असा अर्ज करावा लागतो.