Income Tax Rules on Gifts: वाढदिवस, साखरपुडा, लग्न, गृहप्रवेश किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात आपण मित्रांना, जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांना भेटवस्तू देतो. पण काही वेळा तुम्हाला या भेटवस्तूंवर कर भरावा लागतो. भेटवस्तू देण्याच्या बाबतीत काही नियम आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हा नियम भेटवस्तूचे मूल्य आणि देणाऱ्याशी तुमचा संबंध, यावर अवलंबून असतो.
या लोकांना भेटवस्तू देण्यावर कोणताही कर नाही
जर तुमचे नातेवाईक भेटवस्तू देत असतील, तर त्याच्यावर कोणताही कर नाही, परंतु तुमच्या मित्रांपैकी कोणी तुम्हाला भेटवस्तू दिल्यास, ते कराच्या कक्षेत येते. पती-पत्नी, भावंडे, पती/पत्नीचा भाऊ किंवा बहीण, वहिनी, मेहुणा, आई/वडिलांचा मेहुणा, काकू, काका, आजी-आजोबा, मुलगा किंवा मुलगी यांना या नातेवाईकांच्या यादीत ठेवले आहे. जर त्यांनी तुम्हाला भेटवस्तू दिली, तर ते कराच्या कक्षेत येत नाही.
या भेटवस्तू करपात्र उत्पन्नात गणल्या जातात
तुमचे मित्र, ओळखीचे व्यक्ती, दूरचे नातेवाईक किंवा तुमच्याशी रक्ताच्या नात्याने संबंधित नसलेल्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तू कराच्या कक्षेत येतात. पण, प्रत्येक भेटवस्तूवर कर आकारला जात नाही. तुमच्या मित्रांनी किंवा ओळखीच्या व्यक्तींनी तुम्हाला 50,000 पेक्षा जास्त दिलेली रोख रक्कम किंवा भेट म्हणून दिलेली जमीन, घर, शेअर्स, दागिने, पेंटिंग, पुतळा इत्यादी, ज्यांचे मूल्य रु. 50,000 पेक्षा जास्त आहे, ते करपात्र उत्पन्न म्हणून गणले जाते. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये ही माहिती देणे आवश्यक आहे. नातेवाईकांकडून मिळालेली भेट 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असली तरी ती करमुक्त मानली जाते.
हे नियम समजून घ्या
- पती-पत्नीमधील भेटवस्तूंच्या व्यवहारांवर कोणताही कर नाही, कारण भेटवस्तूंच्या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न इनकम क्लबिंगच्या कक्षेत येते.
- नातेवाइकांकडून मालमत्ता, शेअर्स, बाँड, वाहने इत्यादी मिळाल्या असतील, तर ते करमुक्त आहेत. मित्रांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून मिळाल्यास ते करपात्र आहेत.
- लग्नात मिळालेली भेटवस्तू पूर्णपणे करमुक्त असते, तर एम्प्लॉयरकडून मिळालेली भेट कराच्या कक्षेत येते.
- मित्रांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून वर्षभरात 50 हजार रुपयांपर्यंतची भेटवस्तू मिळाल्यास ती करमुक्त ठेवली जाते, 50 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमत असल्यास कर भरावा लागतो.
- जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या मालमत्तेवर कोणतेही कर लागत नाही, परंतु त्या मालमत्तेचा विक्रीवर कर भरावा लागतो.
- मृत्युपत्रात मिळालेल्या मालमत्तेवर कोणताही कर नाही, मात्र ही मालमत्ता विकल्यावर कर भरावा लागतो.