नवी दिल्ली : भांडवली लाभ करात (कॅपिटल गेन्स टॅक्स) बदल करण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्टीकरण आयकर विभागाने दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत चर्चा होती. त्यास आता पूर्णविराम लागला आहे.
२०२४ मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास आर्थिक विषमता दूर करण्यासाठी श्रीमंतांवर अतिरिक्त भांडवली लाभ कर लावण्यात येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा होती. श्रीमंतांवर अधिक भांडवली लाभ कर लावण्यासाठी थेट कर व्यवस्थेत काही बदल करण्यात येऊ शकतात. ज्यांचे उत्पन्न अधिक आहे, त्यांच्यावर हा वाढीव कर लावण्यात येऊ शकतो. ती वित्त मंत्रालयाने फेटाळली होती. आता आयकर विभागाने अधिकृत ट्वीट
करून अशी कोणतीही योजना नसल्याचा खुलासा केला आहे. आयकर विभागाच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘भांडवली लाभ करात बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे आलेला नाही.’