Join us

करदाते वाढले, मात्र करसंकलन घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 5:18 AM

चालू वित्त वर्षात ई-रिटर्न भरणाऱ्या वैयक्तिक प्राप्तिकर दात्यांची संख्या ७० टक्क्यांनी वाढली असली, तरी कर संकलन मात्र ३४ टक्क्यांनी घटले आहे.

नवी दिल्ली : चालू वित्त वर्षात ई-रिटर्न भरणाऱ्या वैयक्तिक प्राप्तिकर दात्यांची संख्या ७० टक्क्यांनी वाढली असली, तरी कर संकलन मात्र ३४ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते आॅगस्ट या काळात ५.४ कोटी लोकांनी वैयक्तिक ई-रिटर्न भरले. त्यांनी भरलेला सरासरी कर मात्र ३४ टक्क्यांनी कमी होऊन २७ हजार ०८३ कोटी रुपयांवर आला. आधीच्या दोन वर्षांत (वित्त वर्र्ष २०१८ आणि वित्त वर्ष २०१७) ई-रिटर्न भरणा करण्यात अनुक्रमे २४ टक्के आणि ३९ टक्के वाढ झाली होती. करसंकलन अल्प प्रमाणात घसरून ४४ हजार कोटींवरून ४०,२०० कोटींवर आले होते.नोटाबंदी आणि जीएसटी यामुळे कर आधार वाढण्यास मदत झाली आहे. तथापि, वैयक्तिक प्राप्तिकरात त्या प्रमाणात वाढ झालेली नाही. करदात्यांची संख्या वाढलेली असताना ही स्थिती आहे.वित्त वर्ष २०१६ मध्ये वैयक्तिक प्राप्तिकर दात्यांची संख्या ५.९ कोटी होती. सन २०१७ मध्ये ती ७.८ कोटी, तर २०१८ मध्ये १० कोटी झाली. मात्र २०१७ मध्ये वैयक्तिक प्राप्तिकर ८.५ टक्क्यांवरून २९ टक्के झाला. २०१८ मध्ये मात्र तो घसरून १९ टक्क्यांवर आला.सूत्रांनी सांगितले की, केवळ करदात्यांची संख्या वाढवून कर व जीडीपीचे गुणोत्तर वाढणार नाही, हे यावरून दिसते. नव्याने प्राप्तिकर रिटर्न दाखल करणारे लोक आपले करपात्र उत्पन्न फारच थोडे दाखवितात अथवा शून्यच दाखवितात. सरकारने याचा तपास करायला हवा.>अनेकांनी दडवले उत्पन्न?एका सरकारी अधिकाºयाने सांगितले की, जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक जण पहिल्यांदाच कर प्रणालीत आले आहे. अनेकांना जीएसटींतर्गत आपले व्यवहार रेकॉर्डवर आणावे लागले. तथापि, हेच व्यवहार प्राप्तिकर रिटर्नमध्ये दाखविण्यास हे लोक अजून तयार नाहीत, असे दिसते. प्राप्तिकर रिटर्नमध्ये उत्पन्न दडविणाºयांची संख्या मोठी असू शकते. छाननीमध्ये ही बाब उघड होईल, तेव्हा प्रत्यक्ष कर भरणा वाढलेला असेल.