Join us

TCS ने रचला इतिहास, Accenture ला मागे टाकत ठरली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 4:22 PM

TCS Market Cap : टीसीएसने मार्केट कॅप (TCS Market Cap) 169.9 अरब डॉलर (जवळपास 12,43,540.29 कोटी रुपये) पार केले आहे.

नवी दिल्ली : टाटा ग्रुपची फ्लॅगशिप फर्म टाटा कंसल्टेंसी सर्विसेज (TCS) जगातील सर्वाधिक वॅल्यू असणारी सॉफ्टवेअर कंपनी ठरली आहे. टीसीएसने सोमवारी एक्सेंचरला (Accenture) मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. टीसीएसने मार्केट कॅप (TCS Market Cap) 169.9 अरब डॉलर (जवळपास 12,43,540.29 कोटी रुपये) पार केले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही भारतातील टीसीएस या दिग्गज आयटी कंपनीने एक्सेंचर कंपनीला मागे टाकले होते. 

दरम्यान, 2018 मध्ये IBM या मार्केटमध्ये अव्वल कंपनी होती. त्यावेळी IBM चा एकूण रेवेन्यू टीसीएसच्या तुलनेत जवळपास 300 टक्के अधिक होता. त्यानंतर दुसऱ्या स्थानी एक्सेंचरचे नाव होते. दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये टीसीएसचे मार्केट 100 अब्ज डॉलरवर पोहोचले होते.

8 जानेवारी 2021 रोजी टीसीएसने आपल्या तिसऱ्या तिमाहीचे परिणाम घोषित केले होते. तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीची कामगिरी जबरदस्त झाली होती. त्यानंतर त्यांच्या शेअरमध्येही मोठी वाढ झाली. 31 डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या या तिमाहीत कंपनीचा कंसोलिडेटेड नफा 8,701 कोटी रुपये झाला असून ज्याचा अंदाज 8515 कोटी रुपयांचा होता. गेल्या तिमाहीमध्ये कंपनीचा कंसोलिडेटेड नफा 8,433 कोटी रुपये होता. तिसर्‍या तिमाहीत कंपनीचा नफा तिमाही आधारावर 16.4 टक्के आणि वार्षिक आधारावर 7.1 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

याचप्रमाणे, तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात तिमाही आधारावर 4.7 टक्के वाढ झाली आहे, तर कंपनीच्या उत्पन्नात वार्षिक आधारावर 5.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे कंसोलिडेटेट उत्पन्न 42,015 कोटी रुपये होते, तर याचा 41,350  कोटी रुपयांचा अंदाज होता. सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचे कंसोलिडेटेड उत्पन्न 40,135 कोटी रुपये होते.

गेल्या 9 वर्षात 2021 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीची सर्वाधिक ग्रोथ पाहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर टीसीएस कंपनीच्या सीईओ यांनी सांगितले होते की, कंपनीची मार्केट पोझिशन आतापर्यंतच्या सर्वात मजबूत स्थितीमध्ये आहे. तिसर्‍या तिमाहीत कंपनीचे कॅश कन्वर्जन विक्रमी उच्चांकावर आहे. याचाच परिणाम कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळाला.

टॅग्स :टाटाव्यवसायतंत्रज्ञान