टाटा समूहाची आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने भरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या तक्रारींवरून सहा कर्मचार्यांना काढून टाकल्याची माहिती समोर आलीये. याशिवाय अनेक स्टाफिंग फर्मना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आलेय. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी गुरुवारी कंपनीच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरहोल्डर्सना ही माहिती दिली.
चंद्रशेखरन यांनी टीसीएसमधील नोकरीशी संबंधित घोटाळ्याबाबत गुरुवारी पहिल्यांदाच जाहीरपणे वक्तव्य केलं. "कंपनीला दोन व्हिसलब्लोअर्सकडून तक्रारी आल्या होत्या. एक तक्रार भारतातून तर दुसरी अमेरिकेतून आली होती. या तक्रारींमध्ये बिझनेस असोसिएट्सच्या नियुक्तींमध्ये पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला होता," असं ते म्हणाले. कंपनीचे कर्मचारी चुकीच्या पद्धतीनं काही स्टाफिंग फर्मची बाजू घेत असल्याचं दिसून आल्याचंही त्यांनी सांगितलं. टाटा कन्सल्टन्सी फर्म १००० पेक्षा अधिक स्टाफिंग फर्मसोबत कंत्राटी पद्धतीनं कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी काम करते.
कंपनी प्रक्रियेचा आढावा घेणारचंद्रशेखरन यांनी भागधारकांना सांगितलं की कंपनी बिझनेस असोसिएट सप्लायर मॅनेजमेंट प्रोसेसचा (TCS to Review Business Supplier Management Process) आढावा घएईल आणि कमकुवत बाजू शोधून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. अशा घटना पुन्हा घडू नये याची काळजी घेतली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
अनेक आर्थिक आव्हानं असूनही टीसीएसनं चांगली कामगिरी केली आहे. तसंच मध्यम ते दीर्घ कालावधीत वाढ कायम राहिल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. टीसीएसला या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये दोन व्हिसलब्लोअर्सच्या तक्रारी आल्या होत्या आणि चौकशीनंतर सहा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्याचवेळी सहा कंपन्यांवर बंदी घालण्यात आल्याचंही अधिक माहिती देताना चंद्रशेखरन म्हणाले.