नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी आयटी सेवा कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ने (टीसीएस) आता ‘वर्क फ्राॅम ऑफिस’ची तयारी सुरू केली असून, १५ नोव्हेंबरपर्यंत नेमून दिलेल्या ‘बेस ब्रँच’ला परतण्याच्या सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कार्यालयातून काम करण्यास सांगताना कर्मचाऱ्याचे आरोग्य आणि सुरक्षा याबाबतीत काळजीपूर्वक विचार केला जाईल.
सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ साथीचा विळखा शिथिल झाल्यामुळे अनेक कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ला टप्प्याटप्प्याने रामराम ठोकण्याचा विचार करीत आहेत. टीसीएसने त्यात पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. टीसीएसच्या देश-विदेशातील कर्मचाऱ्यांची संख्या ५,२८,७४८ आहे. त्यातील केवळ ५ टक्के कर्मचारी सध्या कार्यालयांतून काम करतात. उरलेले सर्व कर्मचारी घरून काम करतात.
कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मनुष्य बळ विभागाचे जागतिक प्रमुख मिलिंद कक्कड यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक कार्यालयीन पत्र पाठविले आहे. पत्रात म्हटले आहे की, कॅलेंडर वर्ष २०२१ च्या अखेरपर्यंत कार्यालयांत परतण्यासाठी आम्ही आमच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करणार आहोत. हे काम टप्प्याटप्प्याने आणि लवचिक पद्धतीने पार पाडले जाईल. आम्ही २५/२५ मॉडेलला बांधिल आहोत. तथापि, त्या मॉडेलकडे जाण्यापूर्वी लोकांनी एकदा कार्यालयात परतणे आवश्यक आहे.
काय आहे टीसीएसचे २५/२५ मॉडेल?
nटीसीएसने गेल्यावर्षीच २५/२५ मॉडेलची घोषणा केली होती. हे हायब्रीड मॉडेल असून त्यानुसार, २०२५ पर्यंत केवळ २५ टक्के कर्मचाऱ्यांनाच कार्यालयांतून काम करण्यास सांगितले जाणार आहे. उरलेले कर्मचारी वर्क फ्रॉम होम सुरू ठेवतील.