Join us

TCS Q2 Results: TCS ला दुसऱ्या तिमाहीत ₹ 11909 कोटींचा नफा, शेअरधारकांना ₹ 10/शेअर लाभांश मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 7:23 PM

TCS Q2 Results Update: लाभांशाची रक्कम 5 नोव्हेंबर रोजी दिली जाईल.

TCS Q2 Results: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 8 टक्क्यांनी वाढून 64,259 कोटी रुपये झाला असून, नफा 11909 कोटी रुपये झाला आहे. विशेष म्हणजे, कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर 10 रुपये लाभांशही जाहीर केला आहे.

त्रैमासिक निकाल जाहीर करताना, TCS ने सांगितले की, कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल रु. 64,259 कोटी आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत रु. 59,692 कोटींच्या महसुलापेक्षा 8 टक्के अधिक आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 11909 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 11,342 कोटी रुपये होता. कंपनीने आपल्या भागधारकांना दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. TCS आपल्या भागधारकांना प्रति शेअर 10 रुपये लाभांश देईल. हा 5 नोव्हेंबर रोजी दिला जाईल. 18 ऑक्टोबर ही लाभांश ठरविण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे.

TCS च्या निकालांबद्दल कंपनीचे CEO आणि MD के कृतिवासन म्हणाले, जागतिक अनिश्चिततेच्या दरम्यान आमच्या सर्वात मोठ्या व्हर्टिकल BFSI ने चांगली रिकव्हरी केली. आमच्या ग्रोथ मार्केटनेमधही मजबूत कामगिरी दिसून आली. आम्ही आमचे ग्राहक, कर्मचारी आणि इतर भागधारकांसाठी आमचे मूल्य अधिक सुधारण्यावर भर देत आहोत.

दरम्यान, बाजार बंद झाल्यानंतर कंपनीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आजच्या सत्रात टीसीएसचा शेअर 0.6 टक्क्यांच्या घसरणीसह 4228 रुपयांवर बंद झाला. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्या निधनामुळे टाटा समूहात शोककळा पसरली आहे. टीसीएसने आपले त्रैमासिक निकाल जाहीर केले आहेत, मात्र निकालाबाबतची पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे.

टॅग्स :टाटाशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक