TCS Q4 Results: एकीकडे मंदीमुळे अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. जगभरातील विविध कंपन्यांमधून लाखो कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं असून येत्या काळात हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) संधीच्या शोधात असलेल्या फ्रेशर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर मिलिंद लक्कड यांनी कंपनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४० हजार फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना आखत असल्याची माहिती दिली.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीनं ४४ हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली आहे. याशिवाय अनुभवी व्यावसायिकांची विक्रमी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती लक्कड यांनी दिली. ऑफर केलेल्या सर्व फ्रेशर्सना कंपनीकडून नक्कीच नोकरी मिळेल. ऑन बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचंही कंपनीनं म्हटलंय.
एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाखांवर
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये निव्वळ आधारावर २२६०० कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता एकूण हेड काऊंट ६ लाख १४ हजार ७९५ झाली आहे. कंपनीनं ५३ हजारांहून अधिक क्लाउड सर्टिफिकेशनचा आकडा ओलांडल्याचे लक्कड म्हणाले. यासह आता एकूण ऑर्गेनिक डेव्हलपमेंट १ लाख १० हजारांच्या पुढे गेली आहे.
फ्रेशर्सना मागणी
कर्मचारी भरतीची प्रक्रिया संथ जरूर झाली आहे. सध्या, बहुतेक ०-३ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचार्यांची भरती केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. चौथ्या तिमाहीत करानंतरचा नफा म्हणजेच PAT १४.८ टक्क्यांच्या वाढीसह ११३९२ कोटी रुपये झाला आहे. वार्षिक आधारावर महसूल १६.९ टक्क्यांच्या वाढीसह ५९१६२ कोटी रुपये राहिला.