Join us  

नगदी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर टीसीएसचा फटका?

By admin | Published: June 27, 2016 3:23 AM

शासनाने आयकरात सर्व वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर टीसीएसची तरतूद आणली व त्यानंतर यावर अनेक वादविवाद, चर्चा सर्वत्र दिसून आली.

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, शासनाने आयकरात सर्व वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर टीसीएसची तरतूद आणली व त्यानंतर यावर अनेक वादविवाद, चर्चा सर्वत्र दिसून आली. तर या टीसीएसच्या तरतुदीमध्ये नेमके काय आहे?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे व करदाते फक्त ५ कोटी आहेत. परंतु मोटार खरेदी व सोने खरेदी करणारे कोट्यवधी लोक आहेत. या सर्व लोकांकडे पैसा येतो कोठून? यासाठी शासनाने ही नवीन टीसीएसची तरतूद आणली आहे. टीसीएसची तरतूद आधीपासून काही विशिष्ट वस्तूंसाठी आहे. परंतु १ जून २0१६पासून टीसीएसचा आवाका वाढला आहे. सर्व वस्तूंच्या रोखीने खरेदी व विक्रीवर टीसीएस लागू केला आहे व काही मर्यादा नमूद केल्या आहेत. ज्यामुळे नगदीने होणाऱ्या मोठ्या व्यवहारांची शासनाला माहिती मिळेल व काळ्या पैशावर निर्बंध लागेल. ही तरतूद स्पष्ट होण्यासाठी शासनाने यावर प्रश्न - उत्तराचे सर्क्युलर काढले आहे.अर्जुन : कृष्णा, ही टीसीएसची तरतूद आहे तरी काय?कृष्ण : अर्जुना, यामध्ये खालीलपैकी कोणत्याही प्रकारात जर टीसीएसची तरतूद लागू होत असेल तर खरेदीदाराला १ टक्का टीसीएस विक्रेत्याला द्यावा लागेल व विक्रेत्याला ते शासनाकडे जमा करून टीसीएसचे रीटर्न दाखल करावे लागेल. उदा. जर एका व्यक्तीने रोखीने रु. २,२0,000चे कपडे विकत घेतले तर त्याला २,२0,000 रुपयांवर १ टक्का म्हणजेच २,२00 रु. विक्रेत्याला अधिक द्यावे लागतील व विक्रेत्याला ते शासनाकडे जमा करावे लागतील व त्याचा रिटर्न दाखल करावा लागेल. तसेच टीसीएस लागू असल्यास बिलावर नमूदही करावे लागेल. प्रत्येक व्यक्ती आयकर रिटर्न दाखल करताना त्याच्या नावावर जमा असलेल्या टीसीएसचे क्रेडिट घेऊ शकतो. म्हणजेच त्याच्या एकूण आयकरातून टीसीएस वजा करून कर भरावा लागेल किंवा परतावा मिळेल.अर्जुन : टीसीएस तरतुदीमधील महत्त्वाच्या बाबी कोणत्या?कृष्ण : अर्जुना, टीसीएस तरतुदीमधील महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे :१) जर विक्री रु. २ लाखांच्या वर असेल परंतु त्यामधील काही रक्कम रोखीने दिली असेल तर त्यावर टीसीएस लागू होणार नाही. उदा. जर ३ लाख रुपयांची वस्तू विकली व १.५ लाख रोखीने व १.५ लाख चेकने मिळाले तर त्यावर टीसीएस येणार नाही. कारण रोखीने २ लाख रुपये दिलेले नाहीत.२) जर रोख रकमेचा खरेदी-विक्रीचा व्यवहार रु. २ लाखांच्या वर गेला तर त्यावर टीसीएस लागू होतो. उदा. जर ५ लाख रुपयांची वस्तू विकली व ३ लाख रोखीने व २ लाख चेकने मिळाले तर ३ लाख रुपयांवर टीसीएस १ टक्का म्हणजेच ३ हजार रुपये करावा लागेल.३) मोटार गाडी रिटेलरला टीसीएस लागू होतो. मॅन्युफॅक्चरर किंवा डिस्ट्रीब्युटरला या १0 लाख रुपयांवरील टीसीएसची तरतूद लागू होत नाही. उदा. कार ग्राहकाला विकल्यास टीसीएस लागेल.४) टीडीएसच्या तरतुदी लागू होत असलेलय वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर टीसीएस लागू होणार नाही.यामुळे खूप लहानसहान प्रश्न उत्पन्न होणार आहेत. शेती, घरगुती, भांडवली आदींसाठी वस्तू घेणाऱ्याला टीसीएसचा फटका बसू शकतो.अर्जुन : तरतुदी पाळल्या नाही, तर? कृष्ण : अर्जुना, टीसीएस तरतुदी पाळल्या नाही, तर-१) जर विक्रेत्याने टीसीएस गोळा केला नाही, तर त्यावर १00 टक्के दंड आकारला जाऊ शकतो.२) टीसीएसचे रिटर्न दाखल केले नाही, तर रु. १0 हजारपर्यंत दंड लागू शकतो.३) टीसीएस शासनाकडे उशिरा जमा केल्यास त्यावर व्याज लागते.४) रीटर्न उशिरा दाखल केले तर रु. २00 प्रति दिवस लेट फीस लागू शकते.अर्जुन : कृष्णा, या टीसीएसच्या तरतुदीतून काय बोध घ्यावा?कृष्णा : १ जानेवारी २0१६पासून कोणत्याही रु. २ लाखांवरील खरेदी व विक्रीमध्ये पॅन अनिवार्य केले आहे. तसेच रोखीने रु. २ लाखांवर खरेदीसाठी टीसीएस लागू केले आहे. रोखीने व्यवहार कमी व्हावा व त्यामुळे काळ्या पैशाचे चलन कमी होईल या आशेने शासन योजना आणत आहे. >125 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात केवळ ५ कोटी करदाते आहेत. आता प्रत्येक व्यक्तीने २ लाखांच्या वर खरेदी-विक्री करताना लक्षपूर्वक व्यवहार करावा. एकतर पॅन नंबर द्यावा लागेल आणि काही नगदी व्यवहारांवर टीसीएससुद्धा लागू होईल. टीसीएस आता रौद्र रूप धारण करेल व याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होणार आहे. घरगुती वस्तूंच्या खरेदी व विक्रीवरही टीसीएसच्या तरतुदी लागू होतात म्हणून विक्रेत्याला कायदा पालनाचा व ग्राहकाला टीसीएसचा फटका बसणार आहे.टीसीएस कोणत्या वस्तूंच्या खरेदीवर लागू होतो?आधीपासून अल्कोहोलीक लीकर व स्क्रॅप यावर १ टक्का, तेंडू लीव्हसवर ५ टक्के, टोल प्लाझा व पार्किंग लॉट यावर २ टक्के टीसीएस होता; परंतु आता शासनाने खालील वस्तू किंवा सेवांच्या विक्रीवर टीसीएस लागू केला आहे.१) जर रोखीने ज्वेलरी रुपये ५ लाखांच्या वर विकली तर त्यावर १ टक्का टीसीएस करावा लागतो.२) जर रोखीने बुलीयन रुपये २ लाखांच्या वर विकले तर त्यावर १ टक्का टीसीएस करावा लागतो.३) जर रोखीने इतर कोणतीही वस्तू किंवा सेवा रु. २ लाखांच्या वर विकली तर त्यावर टीसीएस करावा लागेल.४) जर मोटार गाडी रु. १0 लाखांच्या वर कोणत्याही स्वरूपात विकली तर त्यावर १ टक्का टीसीएस करावा लागेल. नगदी असो वा बँकेद्वारे या व्यवहारावर टीसीएस लागेल.