नवी दिल्ली: देशव्यापी लॉकडाऊनच्या वेळी वर्क फ्रॉम होम सिस्टीम सुरू करण्यात आले होते. मात्र परिस्थिती सुधारत असल्याने बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफीसमध्ये बोलावणे सुरू केले आहे. आता याच क्रमाने देशातील आघाडीची IT कंपनी TCS (Tata Consultancy Services) नेही आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावणे सुरू केले आहे. यासाठी कंपनीने आदेश जारी केला आहे.
सध्या वरिष्ठ कार्यालयात जाणार आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र ऑफीसमध्ये बोलावले जाणार नाही. सध्या कंपनीच्या उच्च स्तरावरील केवळ 50 हजार कर्मचारीच कार्यालयात जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ 3 दिवस कार्यालयात जावे लागणार आहे. उर्वरित दोन दिवस या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करावे लागेल.
TCS चे CEO आणि MD राजेश गोपीनाथन म्हणाले, “या महिन्यापासून म्हणजेच एप्रिल महिन्यापासून कंपनीचे वरिष्ठ सहकारी कार्यालयात यायला सुरुवात करतील. कार्यालयात बोलावल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू वाढवली जाईल. या वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजेच जून-जुलैपर्यंत बहुतांश कर्मचारी (80 टक्के) कार्यालयातून कामाला लागतील."
कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईलएमडी राजेश गोपीनाथन पुढे म्हणाले की, चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये TCS आपल्या कर्मचार्यांच्या पगारात 6-8 टक्के वाढ करेल. या पगारात कंपनीने गेल्या वर्षीही वाढ केली होती. याशिवाय टीसीएसने गेल्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ केली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने 35,209 नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली होती. यासह TCS च्या कर्मचाऱ्यांची संख्या 5,92,195 वर पोहोचली आहे.