नवी दिल्ली: २० रुपयांचा चहा आणि त्यावर ५० रुपयांचे सेवा शुल्क, असा एक चहा ७० रुपयाला पडत असेल तर कोणीही विचार करेल की, हा चहा नक्कीच एखाद्या पंचतारांकित हॉटेलातील असणार. पण, हा महागडा चहा पंचातारांकित हॉटेलातील नसून भारतीय रेल्वेच्या शताब्दी एक्स्प्रेसमधील आहे. रेल्वेमध्ये खानपान सेवा पुरविणाऱ्या आयआरसीटीसीकडून तो विकला जात असल्याचे मंगळवारी दिल्ली-भोपाळ या मार्गावरील शताब्दी एक्स्प्रेसमध्ये उघडकीस आले.
एका पत्रकाराने रेल्वेतील या लुटीचा पर्दाफाश केला. सोबत आयआरसीटीसीची दोन बिलेही त्यांनी जोडली. संबंधित पत्रकाराने ‘आहे ना कमालीची लूट’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे. राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेस या रेल्वेच्या प्रीमियम श्रेणीतील गाड्या मानल्या जातात. यात तिकिटासोबतच जेवणही बुक करता येते.
अधिकारी काय म्हणतात?
- रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे बिल चुकून दिले गेलेले नाही. अथवा हा ‘ओव्हरचार्जिंग’चाही प्रकार नाही.
- हे वैध बिल आहे. रेल्वे बोर्डाच्या पर्यटन व कॅटरिंग संचालकांनी २०१८ मध्येच यासंबंधीची अधिसूचना जारी केली होती. त्यात स्पष्टपणे म्हटले होते की, पूर्व बुकिंग नसताना रेल्वेत भोजन अथवा चहा मागविल्यास त्यावर ५० रुपयांचे अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाईल.