भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्स या संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं इलेक्ट्रिक सायकल उत्पादक कंपनी E-Motorad मध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी कुणाल गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे महेंद्रसिंग धोनीला ई-मोटरॅडमध्ये इक्विटी मालकी मिळेल. यासह धोनी कंपनीचा ब्रँड एंडोर्सर म्हणून नवीन भूमिका साकारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
गेल्या काही वर्षांत धोनीने ज्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे त्या यादीत पुणेस्थित ई-मोटरॅड सामील झालं आहे. यामध्ये बंगळुरूमधील फिटनेस स्टार्टअप तगडा रहो, डिजिटल कर्ज देणारा प्लॅटफॉर्म खाताबुक आणि गुरुग्राममधील युझ्ड कार रिटेलर Cars24 यांचा समावेश आहे.
धोनीनं काय म्हटलं?
"भविष्य आपल्या हातात आहे. आम्ही अशा युगात आहोत, जिथे सस्टेनेबल सोल्युशन्सला आकार देण्यात इनोव्हेशन मोठी भूमिका साकारतो आणि मी नव्या काळाच्या कंपन्यांचा प्रशंसक आहे," असं महेंद्रसिंग धोनीनं म्हटल्याचं इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलं. "धोनीपेक्षा चांगला आणि विश्वासार्ह असा दुसरा कोणताही ब्रँड नाही. धोनी या ब्रँडमध्ये सामील झाल्याने ई-बाइकिंग श्रेणीमध्ये अधिक जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण होईल," असं गुप्ता म्हणाले.