नवी दिल्ली : 2023 मध्ये देशातील सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये (Service Industry) नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. एकीकडे, जगातील अनेक देशांमध्ये नोकर कपातीचा टप्पा सुरू आहे तर दुसरीकडे, भारतातील मजबूत बिझिनेस सेंटिमेंटमुळे सर्व्हिस इंडस्ट्रीशी संबंधित कंपन्या जबरदस्त नोकरभरती करणार आहेत. एका रिपोर्टनुसार, सर्व्हिस इंडस्ट्रीतील 77 टक्के नियोक्ते 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत जानेवारी ते मार्च दरम्यान नवीन नियुक्ती करण्याची योजना आखत आहेत.
एचआर फर्म टीमलीजच्या (TeamLease) एम्प्लॉयमेंट आउटलुकच्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या तिमाहीत 73 टक्के नियोक्त्याने हे सांगितले होते. रिपोर्टमध्ये 14 शहरांमधील 14 प्रकारच्या सर्व्हिस इंडस्ट्रीमधील 573 लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. ही नियुक्ती एंट्री, ज्युनिअर, मिड आणि सिनिअर अशा सर्व लेव्हलवर असणार आहे. यासोबतच ही भरती मेट्रो, टियर-1, टियर-2 आणि टियर-3 शहरांसाठी तसेच ग्रामीण भागांसाठी केली जाणार आहे.
सर्व्हिस आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील 68 टक्के नियोक्त्यानी पॉझिटिव्ह हायरिंग सेंटिमेंट व्यक्त केली आहे. तसेच, प्रमुख मार्केटमध्ये भारतीय सर्व्हिस इंडस्ट्रीत 68 टक्के भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. आशिया पॅसिफिकमध्ये ही संख्या 48 टक्के आणि अमेरिकेत 48 टक्के आहे. भारतातील 98 टक्के ई-कॉमर्स नियोक्ते सेवा क्षेत्राचे आहेत. त्यानंतर दूरसंचार 94 टक्के, शैक्षणिक सेवा 93 टक्के, वित्तीय सेवा 88 टक्के, रिटेल 85 टक्के आणि लॉजिस्टिक 81 टक्के आहे.
रिपोर्टनुसार, 82 टक्के मोठ्या कंपन्यांनी, 61 टक्के छोट्या कंपन्यांनी आणि 50 टक्के मध्यम उद्योगांनी नोकरी देण्याची तयारी दर्शवली आहे. टीमलीज सर्व्हिसेसचे चीफ बिझनेस ऑफिसर मयूर तडय यांनी सांगितले की, जगातील इतर देशांमध्ये नोकरभरती स्थगिती किंवा कपातीवर जोर आहे, परंतु भारतात मात्र सेंटीमेंटमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे.