Join us

ऑफिसला या, तेव्हाच वाढणार पगार आणि मिळणार प्रमोशन; TCS नं कर्मचाऱ्यांसमोर ठेवली अट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 12:10 PM

देशातील आघाडीची टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सीनं कर्मचाऱ्यांसमोर पगारवाढ आणि प्रमोशनसाठी एक अट ठेवली आहे.

फेब्रुवारी महिना सुरू होताच ऑफिसमधील कर्मचारी आणि एचआर टीममध्ये पगारवाढ आणि प्रमोशनची चर्चा होताना दिसते. दरम्यान, देशातील आघाडीची टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सीनं कर्मचाऱ्यांसमोर पगारवाढ आणि प्रमोशनसाठी एक अट ठेवली आहे. टीसीएसनं अलीकडेच एक पाऊल उचललं आहे, त्याचा नोकरीच्या बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो. टीसीएसनं कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्यासाठी कोणती अट ठेवली आहे ते जाणून घेऊया. 

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेली टीसीएस काही काळापासून आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी टीसीएसनं आधीच अनेक पावलं उचलली आहेत. आता कंपनीचं नवं पाऊल आश्चर्यचकित करणारं आहे. कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी आणि पगारवाढीसाठी मोठा निर्णय घेतलाय. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, कंपनीनं ऑफिस-टू-ऑफिसचे पॉलिसी अधित कठोर केली आहे. आता व्हेरिएबल पे ला या पॉलिसीशी जोडण्यात आलं आहे. प्रमोशनदेखील ऑफिस-टू-ऑफिस पॉलिसीशी जोडण्यात आलंय. याचा अर्थ येत्या काही दिवसांत टीसीएस कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल किंवा त्यांना प्रमोशन कसं मिळेल हे सर्व त्यांच्या ऑफिसमध्ये परतण्यावर अवलंबून असेल. 

सर्वांना लागू होणार पॉलिसी 

कंपनीनं स्पष्ट केलंय की त्यांची नवीन ऑफिस-टू-ऑफिस पॉलिसी केवळ जुन्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर फ्रेशर्सनाही लागू आहे. ज्या फ्रेशर्सनं आपले असाइन्ड कोर्सेस पूर्ण केलेत आणि आता ३ लाखांचया स्टँडर्ड अॅन्युअल कंपेनसेशनपेक्षा अधिक रक्कम मिळवण्यासाठी पात्र आहेत, त्यांना देखील रिटर्न टू ऑफिस पॉलिसी लागू होईल. 

आठवड्यातून ५ दिवस येणं आवश्यक 

कोरोना महासाथीच्या काळात कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. त्यानंतर आता फार कमी कर्मचारी ऑफिसमध्ये येऊन काम करत आहेत. कंपनीनं त्यांना यापूर्वी अनेकदा ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास सांगितलं, मात्र कर्मचाऱ्यांनी ऐकलं नाही. त्यानंतर टीसीएसनं आपलं धोरण बदललं असून आता आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात येणं बंधनकारक केलं आहे. म्हणजेच टीसीएसनं आता वर्क फ्रॉम होम पॉलिसी पूर्णपणे बंद केली आहे.

टॅग्स :टाटानोकरी