नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सकाळपासून ट्रेडिंग थांबवण्यात आलं होतं. एनएसईच्या इंडेक्स फीड अपडेशनमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या. टेलिकॉम लिंकमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानं ट्रेडिंग थांबवण्यात आल्याचं एनएसईनं म्हटलं होतं. सर्वत सेगमेंट ११ वाजून ४० मिनिटांनी बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आता तांत्रिक समस्या दूर करण्यात आली असून आता पुन्हा ट्रेडिंगला सुरूवात होणार आहे.
दरम्यान, आज बीएसई आणि एनएसईवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ट्रेडिंग होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापूर्वी ब्रोकर फर्म Zerodha नं ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार एनएसई इंडेक्समध्ये लाईव्ह डेटा अपडेट होत नसल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच Nifty 50, Nifty Bank शी निगडीत असलेल्या लाईव्ह अपडेट्स मिळवण्यात समस्या येत आहेत. यासंदर्भात आम्ही एनएसईशी संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. चूक कोणाची?लाईव्ह फीडवर नजर ठेवणारे रिटेल ट्रेडर्स सकाळपासूनच या समस्येविषयी तक्रार करत होते. एनएसई हे तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक मानलं जातं. यामध्ये आलेल्या तांत्रिक समस्येवरून प्रश्नही उपस्थित केले जात होते. ही चूक एनएसईची आहे का टेलिकॉम कंपन्यांची असाही प्रश्न विचारला जात होता. जाणकारांच्या म्हणण्यानुसार सेबीच्या नियमाप्रमाणे गुंतवणूकदारांना काय समस्या निर्माण झाली आणि पुढे काय पावलं उचलली जाणार याची माहिती द्यावी लागते.