Join us

छप्परफाड! एका रात्रीत क्रिप्टोतून कमावले २० लाख; मर्सिडिझ फिरवणारा १८ वर्षांचा तरुण आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 3:13 PM

क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई; शाळेत अनेकांनी थट्टा केलेला तरुण आज कोट्यधीश

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असलेल्या एक १८ वर्षांचा तरुण क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून कोट्यधीश झाला आहे. सॅम्युएल स्नेल असं या तरुणाचं नाव आहे. गोल्ड कोस्टमध्ये राहत असलेल्या सॅम्युएलनं आता 'क्रिप्टो गॉड्स' नावाच्या एका खासगी गटाची सुरुवात केली आहे. त्यातून तो लोकांना क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याच्या पद्धती शिकवतो.

सॅम्युएलनं तयार केलेला गट ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा खासगी क्रिप्टो गट आहे. त्यात ३ हजाराहून अधिक सदस्य आहेत. यासोबतच सॅम्युएल त्याच्या टिकटॉक अकाऊंटच्या माध्यमातूनही क्रिप्टोसंदर्भातील अनेक व्हिडीओ लोकांपर्यंत पोहोचवतो. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक कशी करायची, त्या माध्यमातून अधिकाधिक नफा कसा कमवायचा, याबद्दलचं मार्गदर्शन सॅम्युएल करतो. आपण क्रिप्टोमधून कोट्यवधींची कमाई कशी केली त्याची माहितीदेखील तो सांगतो.

सध्या क्रिप्टो बाजारात काय चाललंय याचा अभ्यास करून संपूर्ण नियोजनासह सॅम्युएल गुंतवणूक करतो. 'एकदा मी एकाच आठवड्यात १५ लाखांहून अधिकची कमाई केली होती. त्यानंतर मी मित्रांना मोफत सहलीला घेऊन गेलो. एकदा तर मी एकाच रात्रीत २० लाख रुपये कमावले होते,' असं सॅम्युएल यांनी सांगितलं.

क्रिप्टोमधून कमावलेल्या पैशातून मी दोन मर्सिडिज कार खरेदी केल्या आहेत. त्यातील एका कारची किंमत २ कोटी ६५ लाख रुपये इतकी आहे. याशिवाय रोलेक्सचं एक डायमंड घड्याळदेखील खरेदी केलं आहे, असं सॅम्युएलनं सांगितलं. २०१४ पासून त्यानं क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अनेक शिक्षकांनी मला क्रिप्टोवर वेळ वाया घालवू नकोस असा सल्ला दिला होता. पण आज मी सर्वात मोठ्या क्रिप्टो समूहाचा मालक आहे, असं सॅम्युएल म्हणाला.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सी