नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी तेजीत असलेला शेअर मार्केट अचानक हजारो अंकांनी कोसळल्यामुळे कोट्यवधी गुंतवणूकदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अशातच कंपन्यांकडून IPO सादर करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. खनिज क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. एका बाजूला शेअर बाजार पडत असला, तरी नव्या उमेदीने गुंतवणूक करण्याची चांगली संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात आहे.
कोलकाता येथे कार्यरत असणाऱ्या तेगा इंडस्ट्रीज लिमिटेडने शेअर मार्केटमध्ये आयपीओ खुला करण्यासंदर्भात घोषणा केली आहे. ०१ डिसेंबर रोजी हा आयपीओ येत असून, ०३ डिसेंबर रोजी तो बंद होत आहे. तेगा इंडस्ट्रीजचे आर्थिक वर्ष २०२० मध्ये कामकाजातून मिळणारे उत्पन्न १७.६२ टक्क्यांनी वाढून ६८४.८५ कोटींपर्यंत पोहोचले. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये हेच उत्पन्न ८०५.५२ कोटी होते. उत्पादन विक्रीत झालेली वाढ महत्त्वाची ठरली असून, कंपनीचा नफा वाढून १३६.४१ कोटींपर्यंत पोहोचला आहे.
तेगा कंपनीच्या शेअर्सची किंमत किती?
तेगा कंपनीची समभाग विक्री बुधवार, ०१ डिसेंबर २०२१ रोजी खुला होणार असून, शुक्रवार, ०३ डिसेंबर २०२१ रोजी बंद होणार आहे. या योजनेसाठी ४४३ ते ४५३ रुपये प्रती इक्विटी शेअर किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान बोली गठ्ठा ३३ इक्विटीशेअर आणि त्यानंतर ३३ इक्विटी शेअरच्या पटीत अर्ज करता येणार आहे. फ्लोअर मूल्य इक्विटी शेअर दर्शनी मूल्याच्या ४४.३ पटीत आणि कॅप मूल्य इक्विटी शेअर दर्शनी मूल्याच्या ४५. ३ पटीत आहे.
दरम्यान, तेगा इंडस्ट्रीजचा हा पहिलाच सार्वजनिक प्रस्ताव आहे. ही कंपनी बल्क सॉलीड हँडलिंग इंडस्ट्रीमधील रिकरिंग ग्राहकोपयोगी उत्पादनांची ‘क्रिटीकल टू ऑपरेट’ तसेच वैश्विक खनिज, खाण क्षेत्रातीलअग्रगण्य निर्माता आणि पुरवठादार आहे. जगभरात महसुलाच्या आधारे, तेगा इंडस्ट्रीज ३० जून २०२१ पर्यंत पॉलिमर आधारित मिल लायनर्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्मातादार आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीत ५५ पेक्षा अधिक खनिज प्रक्रिया आणि साहित्य हाताळणी उत्पादनांचा समावेश असून त्यात खाण साहित्य, सरासरी साहित्य आणि खाण उद्योगाशी निगडीत क्षेत्राशी विस्तृत उत्पादनश्रेणीचा समावेश आहे.