Join us

तेगा इंडस्ट्रीजचे दमदार पदार्पण! एन्ट्रीलाच गुंतवणूकदार मालामाल; कंपनीने दिले ६८ टक्के रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 6:34 PM

आयपीओमध्ये कंपनीने प्रती शेअर ४५३ रुपये दर ठेवला होता. प्रत्यक्षात शेअरची ७६० रुपयांना नोंद झाली.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर उतार-चढाव पाहायला मिळत असून, काही कंपन्यांच्या उत्तम कामगिरीमुळे गुंतवणूकदार मालामाल होताना दिसत आहेत. अनेकविध कंपन्यांचे IPO बाजार दाखल होत आहेत. यातच खनिज उद्योगात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेगा इंडस्ट्रीजने पदार्पणातच दमदार रिटर्न्स दिले आहेत. आयपीओमध्ये कंपनीने प्रती शेअर ४५३ रुपये असा दर ठेवला होता. प्रत्यक्षात शेअरची ७६० रुपयांना नोंद झाली.

तेगा इंडस्ट्रीजचा शेअर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर तब्बल ६८ टक्के अधिक दराने सूचीबद्ध झाला. या कंपनीने १ ते ३ डिसेंबर दरम्यान समभाग विक्रीसाठी गुंतवणूकदारांकडून अर्ज मागवले होते. कंपनीच्या आयपीओला तुफान प्रतिसाद मिळाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव हिस्सा २१५.४५ पटीने सबस्क्राईब झाला. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा ६६६ पटीने सबस्क्राईब झाला होता. किर्कोळ गुंतवणूकदारांसाठी १ शेअरकरिता २९ पटीने मागणी प्राप्त झाली होती.

कंपनीने ६१९ कोटीचे भांडवल उभारले

तेगा इंडस्ट्रीजचा शेअर प्रीमियम ग्रे मार्केटमध्ये ३०० ते ३२० रुपयांपर्यंत वाढला होता. त्यामुळे एक चांगली लिस्टिंग होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. कंपनीने भांडवली बाजारात ६१९ कोटीचे भांडवल उभारले. तसेच आयपीओमध्ये समभाग प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांना मालामाल देखील केले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा घंटा नाद करून तेगा इंडस्ट्रीजच्या शेअरची नोंदणी झाली. एनएसईवर या कंपनीचा शेअर ७६० रुपयांवर नोंद झाला. तर बीएसईवर या शेअरने ७५३ रुपयांच्या स्तरावर पदार्पण केले.

दरम्यान, तेगा इंडस्ट्रीज मिनिरल बेनीफिसीएशन, खाण आणि बल्क सॉलिड हँडलिंग इंडस्ट्रीमधील खाण तसेच खनिजेप्रक्रिया, तपासणी, चुरा करणे आणि साहित्य हाताळणीत उद्योगात आहे. तेगा इंडस्ट्रीज ३० जून २०२१ पर्यंत पॉलिमर आधारित मिल लायनर्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्मातादार आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीत ५५ पेक्षा अधिक खनिज प्रक्रियाआणि साहित्य हाताळणी उत्पादनांचा समावेश असून त्यात खाण साहित्य, सरासरी साहित्य आणि खाण उद्योगाशी निगडीत क्षेत्राशी विस्तृत उत्पादनश्रेणीचा समावेश आहे. 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार