Join us

दूरसंचार क्षेत्रातील दरयुद्ध ग्राहकहिताचे

By admin | Published: September 17, 2016 5:51 AM

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने भारतात आक्रमक ४ जी योजना सादर केल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत देशाचे दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने भारतात आक्रमक ४ जी योजना सादर केल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत देशाचे दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले की, देशात जेव्हा जेव्हा दरयुद्ध भडकले, तेव्हा तेव्हा ग्राहकांचाच लाभ झाला आहे.

स्पर्धेमुळे सरकारच्या महसुलावर कोणताही परिणाम होणार नाही. सिन्हा यांनी सांगितले की, गेल्या १८ ते २0 वर्षांच्या दूरसंचार क्षेत्रातील इतिहासावर नजर टाकल्यास असे लक्षात येईल की, दरयुद्धाने प्रत्येक वेळी ग्राहकांचाच लाभ झाला आहे. ग्राहक हाच राजा आहे, असे माझे मत आहे. लोकांसाठी काम करणारे कोणतेही सरकार माझ्या मताशी सहमत होईल.

दूरसंचारमंत्र्यांनी काल येथील भारतीय वाणिज्य दूतावासात भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले. त्याप्रसंगी त्यांना रिलायन्स जिओबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले. जिओने मोफत व्हाईस कॉल आणि अत्यंत स्वस्त दरात डाटा सेवा देण्याची पेशकश केली आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रात दरयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिन्हा म्हणाले की, भारतीय दूरसंचार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. रिलायन्स जिओ व्हाईस कॉल स्वस्त दरात उपलब्ध करून देणार असेल, तर अन्य कंपन्यांनाही चांगली गुणवत्ता आणि स्पर्धात्मक दर ठेवावे लागतील. हे देशासाठी अंतिमत: लाभदायकच ठरेल.महसूल वाढेलचदर कमी झाल्यामुळे सरकारच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता सिन्हा यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले की, सुरुवातीचे तीन-चार महिने महसुलात घट होऊ शकते. तथापि, अंतिमत: सरकारचा महसूल वाढेलच. नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांत दूरसंचार क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. पुढील महिन्यात होणारा स्पेक्ट्रम लिलाव सर्वांत मोठा लिलाव असेल. सध्या देशात सध्या सात दूरसंचार आॅपरेटर कंपन्या आहेत. आयडिया, व्होडाफोन, एअरटेल, एअरसेल, रिलायन्स कॉम आणि रिलायन्स जिओ या सर्वच कंपन्या लिलावात भाग घेत आहेत.