बंगळुरू : पेटीएम पेमेंट्स बँकेने ३,५00 घोटाळेबाज मोबाइल फोन क्रमांकांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. या क्रमांकांवरून एसएमएस व फोन कॉलच्या माध्यमातून होणाऱ्या आॅनलाइन फसवणुकीच्या प्रकारास आळा घालण्यासाठी दूरसंचार कंपन्यांकडून पुरेशी कारवाई होत नसल्याची तक्रार ‘पेटीएम’ने केली आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेकडून पेटीएम ई-वॉलेट चालविण्यात येते. कंपनीचे एमडी व सीईओ सतीश गुप्ता यांनी सांगितले की, आॅनलाइन प्लॅटफॉर्मवरून फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे दूरसंचार कंपन्यांनी मान्य केले आहे. तथापि, फसवणूक प्रकरणात सहभागी क्रमांक देऊन तक्रार केल्यानंतरही कंपन्यांकडून कारवाई केली जात नाही.
सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले की, दूरसंचार सेवादात्या कंपन्यांकडून तक्रार निवारण व्यवस्थेचे योग्य पालन केले जात आहे. ट्रायच्या तक्रार निवारण व्यवस्थेनुसार, दूरसंचार ग्राहकास अनाहूत व्यावसायिक संपर्काविरुद्ध तक्रार करण्याचा हक्क आहे. नॉयडास्थित कंपनीने बनवेगिरीशी संबंधित ३,५00 मोबाइल क्रमांकाचा डाटा ट्रायसोबतही सामायिक केला आहे. याशिवाय गृहमंत्रालय आणि सायबर सुरक्षा संस्था सीईआरटी-इन यांच्याकडेही हा डाटा कंपनीने पाठविला आहे. (वृत्तसंस्था)
घोटाळेबाज कॉलविरोधात टेलीकॉमची कारवाई नाही- पेटीएम
३,५00 क्रमांकांविरुद्ध एफआयआर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 02:53 AM2020-02-28T02:53:26+5:302020-02-28T02:54:45+5:30