टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाच्या (Vodafone Idea) समोरील संकटं संपण्याचं नाव घेत नाहीयेत. आता कंपनीची डोकेदुखी आणखी वाढली आहे. १०,७६,५६,७३३ रुपयांचा दंड भरण्याचा आदेश मिळाला आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, २०१७ अंतर्गत लखनौ, उत्तर प्रदेश येथील प्रधान आयुक्त, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयाने हा आदेश जारी केला आहे.
कंपनीनं याबाबत शेअर बाजारांना माहिती दिली आहे. एक्स्चेंज फाइलिंगमध्ये, व्होडाफोन आयडियाने म्हटले आहे की जीएसटी प्रणालीमध्ये CENVAT क्रेडिटच्या चुकीच्या ट्रान्झिशनचा आरोप करण्यात आला आहे.व्होडाफोन आयडियाला हा आदेश ३ जानेवारी २०२४ रोजी मिळाला आहे. कंपनीनं यासंदर्भात माहिती देताना या आदेशाशी सहमत नसून हा आदेश मागे घेण्यासाठी/सुधारणेसाठी योग्य कायदेशीर पावले उचलणार असल्याचं म्हटलं. व्होडाफोन आयडियावर या आदेशाच्या आर्थिक प्रभावाबाबत सांगायचं झालं तर तो केवळ टॅक्स डिमांड, व्याज आणि लावण्यात आलेल्या दंडापर्यंत मर्यादित आहे.
ऑक्टोबरमध्ये २०.४ लाख ग्राहकांनी सोडली साथभारतीय दूरसंचार प्राधिकरणानं (TRAI) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, व्होडाफोन आयडियाच्या २०.४ लाख ग्राहकांनी ऑक्टोबर महिन्यात कंपनीची साथ सोडल्याचं म्हटलं आहे. टेलिकॉम मार्केटमध्ये व्होडाफोन आयडियाचा वाटा १९.५९ टक्के आहे. तर यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये ७.५ लाख युझर्सनं कंपनीची साथ सोडली.