नवी दिल्ली : २0११ साली मुंबईजवळील समुद्रात तेलवाहू जहाजातून झालेल्या तेलगळती प्रकरणी कतार येथील डेल्टा नेव्हिगेशन कंपनीला १00 कोटी रुपयांचा, तर भारतातील आघाडीची कंपनी अदाणी एंटरप्रायजेसला ५ कोटी रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने ही कारवाई केली. ४ आॅगस्ट २0११ रोजी दक्षिण मुंबईच्या किनाऱ्यासून २0 सागरी मैलावर अरबी समुद्रात कोळसा वाहतूक करणारे एम.व्ही. राक नावाचे जहाज बुडाले होते. हे जहाज डेल्टा नेव्हिगेशनच्या मालकीचे होते. अदाणी एंटरप्रायजेसच्या गुजरातमधील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी हा कोळसा आणला जात होता. जहाजावर २९0 टन इंधन तेल, ५0 टन डिझेल आणि ६0 हजार टन कोळसा होता. अदाणी एंटरप्रायजेसच्या गुजरातमधील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी हा कोळसा पुरविण्यात येणार होता. जहाजाला छिद्र पडल्याने पाणी शिरून ते बुडाले होते. जहाजावरील सर्व ६0 हजार टन कोळसा व तेलाची गळती होऊन ते समुद्रात गेले. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने दोन्ही कंपन्यांवर खटला भरला होता. कतारची डेल्टा नेव्हिगेशन कंपनी यात मुख्य आरोपी होती, तर अदाणी सहआरोपी होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तेलगळतीमुळे झाला कोट्यवधींचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 4:37 AM