नवी दिल्ली : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग कोसळले. त्यामुळे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अलर्ट मोडवर आली असून अदानी समूहाला किती कर्ज दिले अथवा या समूहात किती गुंतवणूक केली याचा तपशील सादर करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व बँकांना दिले आहेत.
नाव न सांगण्याच्या अटीवर उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने एक अहवाल जाहीर करून अदानी समूहाने गैरप्रकार केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर समूहातील कंपन्यांच्या समभागांचे मूल्य कोसळले आहे. त्यामुळे समभागधारकांचे अब्जावधी रुपये बुडाले आहेत. याचा फटका समूहाला कर्ज देणाऱ्या अथवा गुंतवणूक करणाऱ्या बँका व वित्तीय संस्थांनाही बसणार आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची माहिती बँकांकडून मागविली आहे. अदानी समूहातील गुंतवणुकीचा तपशीलही बँकांकडे मागण्यात आला आहे. अदानी समूहामध्ये बँकांचा किती पैसा अडकलेला आहे, याची माहिती या निमित्ताने घेतली जात आहे.
बँक स्थितीबाबत आरबीआय सावध - हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे समभाग रोज घसरत आहेत. गुरुवारीही समूहाच्या समभागांनी मोठी आपटी खाल्ली. - या आपटीचा कर्जदाता बँकांना किती फटका बसू शकतो, याचा अंदाज यानिमित्ताने घेतला जात आहे, असे समजते. - अदानी समूहाच्या घसरगुंडीमुळे बँकांची वित्तीय स्थिती घसरू नये, यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे. त्यासाठीच रिझर्व्ह बँकेने ही माहिती मागितली आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे एफपीओ घेतला मागे : गौतम अदानीनवी दिल्ली : पूर्णपणे सबस्क्राइब्ड झालेला आपल्या समूहाचा ‘फॉलो-ऑन पब्लिक ऑफर’ (एफपीओ) इश्यू बाजारातील अस्थिर स्थितीमुळे मागे घेण्यात आला आहे, असे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी गुरुवारी जाहीर केले. अमेरिकी शॉर्ट सेलर संस्था हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या समभागांना आतापर्यंत तब्बल १०० अब्ज डॉलरचा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर अदानी यांनी एका व्हिडीओ संदेशातून बाजू मांडली.
अदानी यांनी सांगितले की, बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, एफपीओ पुढे नेणे नैतिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही, असे कंपनीच्या बोर्डला वाटते. त्यामुळे तो मागे घेण्यात आला. या निर्णयाचा कंपनीच्या सध्याच्या परिचालनावर तसेच भविष्यातील योजनांवर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीचा पाया मजबूत आहे. ताळेबंद आणि मालमत्ता मजबूत आहेत. आम्ही आमच्या कर्जाचे हप्ते नियमित ठेवलेले आहेत.