Join us  

बॅंकांना सांगा ठणकावून, ही कंपनी द्या बदलून! आरबीआयने दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 7:22 AM

आता ग्राहकांना कार्ड घेताना आपल्या पसंतीनुसार कार्ड नेटवर्क निवडणे शक्य होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : ऑनलाइन व्यहाराला प्रोत्साहन देताना हे व्यवहार अधिकाधिक सुरक्षितपणे कसे होतील, याचा विचार करून सरकार वेळोवेळी अनेक निर्णय घेत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही ग्राहकांच्या हिताचा विचार करून क्रेडिट, डेबिट कार्ड तसेच प्रीपेड कार्ड वापरणाऱ्यांसाठी १ ऑक्टोबरपासून नियमांमध्ये नवा बदल केला आहे. आता ग्राहकांना कार्ड घेताना आपल्या पसंतीनुसार कार्ड नेटवर्क निवडणे शक्य होणार आहे. ग्राहक आतापर्यंत हव्या असलेल्या नेटवर्कसाठी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा वापरत असत. आता अशीच सुविधा बँकांची कार्ड घेतानाही मिळू शकणार आहे.

काय आहेत आरबीआयच्या सूचना?

ग्राहकांना पसंतीनुसार कार्ड नेटवर्क निवडता आले पाहिजे. त्यांना ही संधी दिली पाहिजे. बँका तसेच बिगरबँक वित्तीय संस्थांनी क्रेडिट-डेबिट तसेच प्रीपेड कार्ड आधीच एखाद्या कार्ड नेटवर्कसह जारी करू नये. कोणत्या नेटवर्कचे क्रेडिट वा डेबिट कार्ड हवे याची विचारणा आधी ग्राहकांना केली पाहिजे.

काय असते कार्ड नेटवर्क?

तुम्ही वापरत असलेल्या क्रेडिट कार्डावर नेहमी अमेरिकन एक्स्प्रेस, व्हिजा, रुपे, डायनर्स क्लब आदी नावे दिसत असतात. वास्तवात ही नावे सुविधा पुरवणाऱ्या नेटवर्कची असतात.

सेवा देण्यासाठी बँकांना नेटवर्कसोबत करार केलेला असतो. यामुळेच कार्डांनी व्यवहार करणे शक्य होत असते.

जुन्या कार्डावर सुविधा मिळणार का?

प्रत्येक कार्डावर व्हॅलिडिटी पीरिएड दिलेला असतो.

हा एक, दोन किंवा चार वर्षांचा असू शकतो.

दिलेल्या एक्स्पायरी डेटवेळी कार्ड रिन्यू करताना नेटवर्क बदलण्याचा पर्याय दिला जाईल.

नव्याने बँक खाते उघडताना ग्राहकाला कार्डचा नेटवर्क प्रोव्हायडर निवडता येईल.

ग्राहकांना काय फायदा मिळणार?

या कार्डांवर नेटवर्कद्वारे वेगवेगळ्या सुविधा, खास ऑफर्स दिल्या जातात. काहींचे शुल्क कमी, तर काहींचे अधिक असते. तसेच, रिवाॅर्डही वेगवेगळे असते.

कार्डाद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर लागणारे शुल्कही वेगवेगळे असते. त्यामुळे आपली गरज, उपयुक्तता आदींचा विचार करून पसंतीनुसार नेटवर्कची निवड करून अधिकाधिक सुविधा घेता येतील.

टॅग्स :बँक