प्रसाद गो. जोशी |
आगामी सप्ताहामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे जाहीर होणारे पतधोरण आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफमुळे काय परिणाम होणार याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची भीती असून, जगामध्ये मंदी येण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून येत्या ९ तारखेला द्वैमासिक पतधोरण घोषित होणार आहे. यावेळी पतधोरण बैठकीकडून बाजाराला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात काय नेमके काय समोर येईल याकडे बाजाराचे लक्ष आहे.
वित्तसंस्थांचा विक्रीचा मारा
भारतामधील शेअर बाजारातून परकीय वित्तसंस्थांनी जोरदार विक्री केली आहे. एप्रिलच्या पहिल्या चार दिवसांत संस्थांनी १०,३५५ कोटी काढून घेतले आहेत. २१ ते २८ मार्च या सप्ताहात संस्थांनी सुमारे ३१ हजार कोटी बाजारात गुंतविल्याने मार्चमध्ये या संस्थांनी काढलेली रक्कम काहीशी कमी होऊन ३९७३ कोटी रुपयांवर पोहोचली होती.
आगामी काळात मंदी येण्याची चिंता
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील देशांवर टॅरिफ लागू केले. आहे. याचा परिणाम जागतिक व्यापारावर होणार आहे. त्यामुळे आगामी काळात जागतिक मंदी येण्याची अपेक्षा भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये याविरोधात नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. याशिवाय या सप्ताहातच फेडरल रिझर्व्हच्या ओपन मार्केट कमिटीची बैठक आहे. तसेच चीनमधील महागाई आणि इंग्लंडमधील जीडीपीची आकडेवारी जाहीर होणार आहे. या आकडेवारीकडेही बाजाराची नजर असणार आहे. अमेरिकेने व्यापारावर लागू केलेल्या शुल्कामुळे जगभरातील बाजारांमध्ये गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. या सप्ताहात अमेरिकेच्या बाजारामध्ये मोठी घसरण झाली. त्याचप्रमाणे भारतीय शेअर बाजारातही घसरण झालेली दिसून आली. याशिवाय चौथ्या तिमाहीची कंपन्यांच्या निकालाची आकडेवारी जाहीर होण्यास प्रारंभ होणार आहे. त्याचाही बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.