Elon Musk Twitter Stake: टेस्लाचे सीईओ (Tesla CEO) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये (Twitter) ९.२ टक्के स्टेक विकत घेतला आहे. त्यांनी ट्विटरचे ७३,४८६,९३८ शेअर्स खरेदी केले आहेत. या वृत्तानंतर ट्विटरच्या शेअरमध्ये तब्बल २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मस्क यांनी पॅसिव्ह स्टेक विकत घेतले आहेत. पॅसिव्ह स्टेक म्हणजे शेअरहोल्डर कंपनी चालवण्यात थेट कोणताही हिस्सा घेऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून मस्क मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर ट्विटरबद्दल सतत ट्वीट करत होते.
आपण स्वतःचे सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा गंभीरपणे विचार करत आहोत, असं काही दिवसांपूर्वी एक ट्वीटला उत्तर देताना मस्क यांनी सांगितलं होतं. एका युझरनं त्यांना स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च करणार का? असा प्रश्न विचारला होता. आपण यावर गांभीर्याने विचार करत आहोत, असं त्यांनी यावर बोलताना सांगितलं होतं. यापूर्वी त्यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर फ्री स्पीच आणि इतर गोष्टींबद्दल पोलही घेतला होता.
काही दिवसांपासून हिंट
फ्री स्पीचला प्राधान्य आणि कमी प्रपोगंडा असलेला असलेला प्लॅटफॉर्म ते लाँच करणार आहेत का असा प्रश्न एका युझरनं एका पोल आणि ट्वीटवर एलॉन मस्क यांना विचारला होता. नुकतीच त्यांनी ट्विटरच्या अल्गोरिदमवर टीकाही केली होती. कार्यशील लोकशाहीसाठी भाषण स्वातंत्र्य आवश्यक असल्याचं मस्क म्हणाले होते.