Join us  

"ऑफिसमध्ये या किंवा नोकरी सोडा!", Tesla चे सीईओ Elon Musk यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 2:35 PM

Elon Musk: यासंदर्भात इलॉन मस्क यांनी टेस्लाच्या कर्मचाऱ्यांना अनेक ईमेल पाठवले आहेत. तसेच, कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले असल्याची कबुलीही त्यांनी ट्विटरवर दिली आहे.

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला 40 तास ऑफिसमध्ये काम करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, कर्मचाऱ्यांनी तसे न केल्यास त्यांनी राजीनामा दिल्याचे मानले जाईल, असेही इलॉन मस्क यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात इलॉन मस्क यांनी टेस्लाच्या कर्मचाऱ्यांना अनेक ईमेल पाठवले आहेत. तसेच, कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले असल्याची कबुलीही त्यांनी ट्विटरवर दिली आहे. इलॉन मस्क यांनी ट्विट केले आहे की, जर एखाद्या कर्मचाऱ्याला कंपनीचे धोरण आवडत नसेल तर तो टेस्ला सोडू शकतो. टेस्ला वाहने तयार करते आणि हे काम फोनवर पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे, असेही इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. 

रिमोटवर काम करणाऱ्या इतर कंपन्यांची खिल्ली उडवत इलॉन मस्क यांनी इतर कंपन्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा देत आहेत, पण या कंपन्यांनी त्यांचे नवीन उत्पादन कधी लाँच केले होते? असा सवाल केला आहे. इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, टेस्लामधील सर्व कर्मचाऱ्यांनी किमान 40 तास ऑफिसमध्ये घालवणे आवश्यक आहे. जर कोणी ऑफिसमध्ये आले नाही, तर त्यांनी राजीनामा दिला आहे, असे मानले जाईल.

इलॉन मस्क यांनी दिले स्वतःचे उदाहरणइलॉन मस्क म्हणाले, "कर्मचारी जेवढे वरिष्ठ असतील, तितकी त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे. त्यामुळेच मी इतका वेळ कारखान्यात राहतो. मी इतका वेळ कारखान्यात राहितो, कारण सर्वांना माझ्यासोबत काम करता येऊ शकेल. जर तसे झाले नसते तर टेस्ला फार पूर्वीच दिवाळखोर झाली असती."

टॅग्स :एलन रीव्ह मस्कटेस्लाकारव्यवसायवाहन