Join us

अंबानींच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा अधिक मस्क यांनी २ महिन्यांत गमावले, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:07 IST

Elon Musk Networth: इलॉन मस्क यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त संपत्ती दोन महिन्यांत गमावली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांच्यासाठी आता २०२५ हे वर्ष वाईट सिद्ध होत आहे.

Elon Musk Networth: इलॉन मस्क यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा जास्त संपत्ती दोन महिन्यांत गमावली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांच्यासाठी आता २०२५ हे वर्ष वाईट सिद्ध होत आहे. या वर्षी आतापर्यंत मस्क यांना ८९.४ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालंय, जे मुकेश अंबानी यांच्या एकूण ८५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे.

वॉल स्ट्रीटमधील टेक शेअर्सच्या घसरणीमुळे गुरुवारी या उद्योगाशी संबंधित अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. इलॉन मस्क यांना ६.३३ अब्ज डॉलरचं नुकसान झालं. कारण, टेस्लाच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनाही गुरुवारी ४.९६ अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागला. याचं कारण म्हणजे त्यांची कंपनी अॅमेझॉनच्या शेअरमध्ये २.६२ टक्क्यांची घसरण.

यावर्षी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या मार्क झुकेरबर्गना ५.३० अब्ज डॉलरचं नुकसान झालंय. मेटा प्लॅटफॉर्म्स या त्यांच्या कंपनीचा शेअर २.२९ टक्क्यांनी घसरला. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार झुकेरबर्ग यांनी या वर्षी आपल्या संपत्तीत २४.९ अब्ज डॉलरची भर घातली आहे. २३२ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ते आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

सर्वात मोठा धक्का जेन्सन हुआंगना

चिप उत्पादक कंपनी एनव्हीडियाचे समभाग कोसळले. एनव्हिडियाच्या शेअरची किंमत ८.५ टक्क्यांनी घसरली. यामुळे कंपनीच्या मार्केट कॅपमधून २७४ अब्ज डॉलरची घसरण झाली. याचा फटका कंपनीचे मालक जेन्सन हुआंग यांना बसला असून गुरुवारी संपत्ती गमावलेल्या अब्जाधीशांमध्ये ते सर्वाधिक तोट्यात होते. त्यांना ९.३२ अब्ज डॉलरचा धक्का बसला. ओरॅकलचे लॅरी एलिसन गुरुवारी गमावलेल्या संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना ७.१० अब्ज डॉलरचं नुकसान झालं. डेलचे मायकेल डेल यांनाही ५.७५ अब्ज डॉलरचं नुकसान झालं.

या वर्षी संपत्ती गमावलेले टॉप ५ अब्जाधीश

१. इलॉन मस्क ८९.४ बिलियन डॉलर२. लॅरी पेज १५.४ बिलियन डॉलर३. सर्गेई ब्रिन १४.३ बिलियन डॉलर४. गौतम अदानी १३.९ बिलियन डॉलर५. चांगपेंग झाओ ११.८ बिलियन डॉलर

स्रोत: ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स

टॅग्स :मुकेश अंबानीएलन रीव्ह मस्क