Tesla Elon Musk : ईव्ही उत्पादक अमेरिकी कंपनी टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचा चीन दौरा कमालीचा यशस्वी झाला असून या दौऱ्यात त्यांनी डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेशी संबंधित तिढा सोडविण्यात यश मिळविले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनची दिग्गज इंटरनेट सर्च कंपनी बायडूने टेस्लासोबत एक करार केला आहे. त्यानुसार, टेस्लाला बायडूच्या मॅपिंग परवाना वापरण्याची परवानगी मिळेल. त्यानुसार, चिनी रस्त्यांचा डेटा टेस्लाला उपलब्ध होईल.
चीनमध्ये संपूर्ण स्वयंचलित (एफएसडी) तंत्रज्ञान सादर करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे मानले जात आहे. मस्क हे रविवारी चीनमध्ये पोहोचले होते. त्यांनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेतली.
प्राप्त माहितीनुसार, टेस्लाने आपले सर्वाधिक आधुनिक ‘ऑटो पायलट सॉफ्टवेअर’ ४ वर्षांपूर्वी सादर केले होते. मात्र डेटा सुरक्षा आणि काही नियम पालनाच्या मुद्द्यांमुळे टेस्ला चीनमध्ये एफएसडी कार सादर करू शकली नव्हती. चीन ही टेस्लासाठी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे हा दौरा कंपनीसाठी महत्त्वाचा होता.