Tesla Plant in India: जगातील सर्वात मोठ्या EV कंपन्यांपैकी एक असलेल्या TESLA ने भारतात आपला कारखाना सुरू करण्याची योजना तुर्तास रद्द केली आहे. काही दिवसांपूर्वीच अशी बातमी आली होती की, कंपनीचे CEO इलॉन मस्क स्वतः भारतात येऊन याबाबत घोषणा करू शकतात. पण, आता कंपनीने भारतात प्लांट न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट कंपनी आहे त्या प्लांटमध्ये स्वस्त कार बनवण्यावर भर देणार आहे.
उत्पादन वाढवण्यावर भरटेस्ला ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने भारत आणि मेक्सिकोमध्ये नवीन प्लांट उभारण्याची तयारी सुरू केली होती, पण आता ही योजना काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता कंपनी नवीन प्लांट उभारण्याऐवजी आहे त्या प्लांटवर लक्ष केंद्रित करू इच्छिते.
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क स्वतः भारतात येऊन गुंतवणूकीबाबत घोषणा करणार होते, पण शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला. आता टेस्लाने 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये 50 टक्के उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, टेस्ला नवीन मॉडेल्स तयार करणार नसून, आहे त्या मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करेल. टेस्लाच्या या पावलाचे गुंतवणूकदारांनीही कौतुक केले. इव्हॉल्व्ह ईटीएफचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणाले की, टेस्लाने नवीन कारखाना उभारण्याची योजना तुर्तास थांबवली, हे एक सकारात्मक पाऊल आहे. टेस्ला विस्तार करण्यापेक्षा बाजारातील आव्हानांकडेही लक्ष देत असून, स्वस्त कार बनविण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
6000 कर्मचाऱ्यांना डच्चूटेस्लाने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 55% घट झाली आहे. दुसरीकडे कंपनीने मोठ्या टाळेबंदीची घोषणा केली. या कॉस्ट कटिंगदरम्यान कंपनी 6,000 लोकांना कामावरुन काढणार आहे. टेस्लाने सांगितले की, ते टेक्सास आणि कॅलिफोर्नियामधील 6,020 कर्मचाऱ्यांना काढण्याच्या विचारात आहेत.