Join us

‘आॅटो एक्स्पो’कडे प्रमुख आठ वाहन कंपन्यांची पाठ

By admin | Published: February 03, 2016 2:56 AM

वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहनप्रेमींसाठी पर्वणी मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील ‘आॅटो एक्स्पो’कडे देशातील प्रमुख आठ कंपन्यांनी पाठ फिरवली आहे

मुंबई : वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहनप्रेमींसाठी पर्वणी मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील ‘आॅटो एक्स्पो’कडे देशातील प्रमुख आठ कंपन्यांनी पाठ फिरवली आहे. एवढेच नव्हे तर अशा प्रदर्शनातील सहभाग हे खर्चिक प्रकरण असून पैशाचा अपव्यय असल्याची स्पष्ट भूमिका बजाज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी घेतली आहे. यामुळे अशा प्रकारच्या खर्चिक प्रदर्शनांच्या आयोजनावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. दिल्लीमध्ये दरवर्षी भव्य अशा आॅटो-शोचे आयोजन करण्यात येते. देशाच्या विविध भागातून दिवसाकाठी लाखो वाहनप्रेमी या प्रदर्शनाला हजेरी लावतात. परदेशी नागरिकांची उपस्थितीही इथे असते. यंदा हे प्रदर्शन ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आले आहे. अशा प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपये खर्ची पडतात. सध्या अर्थकारणातील शैथिल्य, वाहन कंपन्यांचा उत्पादनावर वाढलेला खर्च आणि मंदावलेला खरेदी दर यामुळे या प्रदर्शनात सहभागी होण्यास वाहन कंपन्या अनुत्सुक असल्याचे दिसते. केवळ बजाज नव्हे तर डॅमलर इंडिया कर्मशियल व्हेअिकल, रॉयल एनफिल्ड, हर्ले डेव्हिडसन, स्कोडा, इंटरनॅशनल कार्स अँड मोटर्स लि. अशा सुमारे आठ प्रमुख कंपन्यांनी या प्रदर्शनाकडे पाठ फिरवली आहे. राजीव बजाज म्हणाले की, एखाद्या नव्या मॉडेलच्या लॉँचसाठी तिथे पाच कोटी रुपये खर्च केले तरी ते कमी पडतील पण, अन्य मार्गाने पाच लाख रुपये खर्च करून अतिशय प्रभावीपणे एखाद्या वाहनाचे लॉचिंग होऊ शकते. अशा प्रदर्शनामुळे वाहनप्रेमींना त्यांच्या आवडीचे वाहन जवळून पाहता येते, असा तर्क मांडला जातो, पण ती सुविधा तर कोणत्याही डिलरच्या शोरुममध्येही मिळते. प्रदर्शनातून कंपन्या आपल्या नव्या वाहनांची आणि भविष्यातील वाहनांची मांडणी करत असतात. नव्या घोषणा करत असतात. काही जागतिक करार इथे होतात. तथापि हा प्रकार खर्चिक आहे. (प्रतिनिधी)