Join us  

रोजगार निर्मितीमध्ये वस्त्रोद्योग पडेल मागे

By admin | Published: July 04, 2016 5:29 AM

वस्त्रोद्योग व तयार कपडे उद्योग (रेडिमेड) रोजगार निर्मितीत मागे पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : वस्त्रोद्योग व तयार कपडे उद्योग (रेडिमेड) रोजगार निर्मितीत मागे पडण्याची शक्यता आहे. येत्या पाच वर्षांत या क्षेत्रात एक कोटी रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा सरकारला आहे; पण, प्रत्यक्षात जेमतेम २९ लाख नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तथापि, या क्षेत्राचा विस्तार ४० टक्क्यांनी वाढून १४२ अब्ज डॉलर होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. एका अहवालात ही माहिती देण्यात आली. उद्योग संघटना टेक्सप्रोसिलच्या अहवालानुसार वस्त्रोद्योगात यांत्रिकीकरण वाढत आहे. आगामी पाच वर्षांत वस्त्रोद्योगात २९ लाख नवे रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाने मागील महिन्यात वस्त्रोद्योगासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली होती. या माध्यमातून ११ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. वस्त्रोद्योगाचा विस्तार होत असला तरी रोजगारनिर्मिती मात्र घटत आहे. जिथे पूर्वी ४० कर्मचारी काम करीत होते तिथे आता २५ व्यक्तीच काम करीत आहेत. युरोपीय संघ, आॅस्ट्रेलिया आणि कॅनडा यांच्यासोबत मुक्त व्यापार करार न झाल्याने ५५ लाख रोजगाराचे नुकसान झाले आहे. जर एफटीएवर स्वाक्षरी झाली असती तर भारतात रोजगार वाढ झाली असती. विश्वबँकेच्या एका अहवालानुसार भारतात ६९ टक्के रोजगाराला भविष्यात धोका आहे. > यांत्रिकीकरण वाढले आणि...वस्त्रोद्योग क्षेत्राचा विस्तार होत असला तरी यांत्रिकीकरण वाढल्याने रोजगारावर कुऱ्हाड पडत आहे. पूर्वीच्या तुलनेत या क्षेत्रात मजुरांची गरज कमी झाली आहे. याचा थेट फटका रोजगारनिर्मितीला बसत आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षात या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा दावा सरकार करत असले तरी सरकारच्या या दाव्यावर साशंकता व्यक्त होत आहे.