Join us  

राज्यातील आठ जिल्ह्यांत उभारणार टेक्सटाईल पार्क

By admin | Published: October 16, 2015 10:15 PM

कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये टेक्सटाइल पार्क उभारण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत

अकोला : कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये टेक्सटाइल पार्क उभारण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठही जिल्ह्यांमध्ये टेक्सटाईल मेगापार्क उभारण्याचे शासनाच्या सहकार, विपणन व टेक्सटाईल विभागाने ठरविले आहे. त्यात अकोला जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. सहकार, विपणन व टेक्सटाईल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी पुणे येथे गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये या संबंधीची घोषणा केली. देशातील औद्योगिक क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ योजना राबविण्यात येत आहे. अमरावती शहरात टेक्सटाईल प्रकल्प उभारणीसाठी ५00 हेक्टर जागा यापूर्वीच उपलब्ध करण्यात आली. कॉटन बेल्ट म्हणून पश्चिम विदर्भ, खान्देश, मराठवाडा हा भाग ओळखला जातो. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. एकेकाळी पश्चिम विदर्भात सूतगिरण्यांसह अनेक कापड उद्योग होते; परंतु कालांतराने सूतगिरण्या आणि कापड उद्योग बंद पडले. आता कॉटन बेल्ट म्हणून पुन्हा ओळखल्या जाणाऱ्या बीड, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि जालना आदी जिल्ह्यांमध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्याचे शासनाने प्रस्तावित केले आहे. वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने राज्यात टेक्सटाईल पार्क उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.