२४ जानेवारी २०२३ रोजी, अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने अदानी समूहाविरुद्ध आपला अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानं अदानी समूहाचं मोठं नुकसान केलं. त्याचा फटका कंपनीला आजपर्यंत बसत आहे. हिंडनबर्ग अहवालाच्या सहा महिन्यांनंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
अदानी यांनी हिंडेनबर्गच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच त्यांचा रिपोर्ट हा द्वेषाने प्रेरित असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंडेनबर्गनं आम्हाला नुकसान पोहोचवण्यासाठी आपला अहवाल प्रसिद्ध केला. आमच्यावर खोटे आणि निराधार आरोप केले. हिंडेनबर्ग अहवाल म्हणजे चुकीची माहिती आणि निराधार आरोप असल्याचं अदानी म्हणाले.
२०२३ मध्ये अदानी ग्रुपच्या एजीएम अंतर्गत अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी टोटल गॅसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) गौतम अदानी यांनी हिंडेनबर्गवर जोरदार टीका केली आणि त्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एजीएममध्ये कंपन्यांचे भागधारक आणि अधिकारी यांना संबोधित करताना, हिंडेनबर्गच्या या आरोपांमागील खरं कारण उघड केलं. "हिंडेनबर्गने आमच्याविरुद्ध खोटा अहवाल जारी केला. ज्यामध्ये आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. आमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. अदानी समूहाविरोधात नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला," असं अदानी यावेळी म्हणाले.
"शॉर्ट सेलर हिंडेनबर्गनं स्वतःचा हेतू आणि स्वतःच्या फायद्यासाठी आमच्याविरुद्ध चुकीचा अहवाल सादर केला. याची वेळही जाणूनबुजून तिच ठेवण्यात आली होती, ज्यावेळी एफपीओ येणार होता. आमच्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही एपीओ मागे घेतला आहे. हिंडेनबर्गच्या नकारात्मक अहवालाचा तोटा सहन करावा लागू नये म्हणून आम्ही गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करतानाच असा निर्णय घेतला," असंही त्यांनी स्पष्ट केलं.