पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा असताना केंद्र सरकारने पेट्रोलिअम कंपन्यांना फायदा पोहोचविणारा निर्णय घेतला आहे. केंद्राने कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर लावलेला विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला आहे. हा कर आजपासून लागू होणार आहे. देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती आवाक्यात ठेवण्यासाठी जुलै २०२२ मध्ये केंद्राने हा कर लागू केला होता.
हा कर कमी केल्याचा फायदा सामान्य ग्राहकांना होणार नाही. परंतू, पेट्रोलिअम कंपन्यांना प्रति टनामागे १८५० रुपयांचा फायदा होणार आहे. विशिष्ट परिस्थितीत मोठा फायदा कमवत असलेल्या कंपन्यांवर हा कार लावला जात होता. दर पंधरा दिवसांनी या कंपन्यांच्या फायद्याचे अवलोकन केले जात होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया युक्रेन युद्ध भडकल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. यामुळे तेल कंपन्यांना तुफान फायदा झाला होता. यामुळे त्यांच्यावर विंडफॉल टॅक्स लावण्यात आला होता.
डिझेल, पेट्रोल आणि विमान इंधन (ATF) च्या निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क शून्यावर आणण्यात आले आहे, नवीन दर १८ सप्टेंबरपासून लागू होतील, असे अधिकृत अधिसूचनेत म्हटले आहे. डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधन किंवा ATF च्या निर्यातीवरील SAED देखील 'शून्य' वर कायम ठेवण्यात आले आहे.
विंडफॉल ९६०० पर्यंत गेला होता...दर १५ दिवसांनी विंडफॉल टॅक्समध्ये बदल केले जात होते. मे महिन्यात हाच कर ९६०० रुपये प्रति टन एवढा होता.१ मे रोजी तो घटवून ९६०० रुपये प्रति टन केला गेला होता. तर १६ मे रोजी केलेल्या संशोधनात घटवून ५७०० रुपये प्रति टन करण्यात आला होता. जो आज शून्यावर आणण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने कंपन्या आता अचानक फायदा कमवू शकत नाहीत, देशातील इंधनाचे दर वाढवू शकत नाहीत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.