नवी दिल्ली - सणासुदीची खरेदी, घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी लाेकांचे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश शहरी भागांतील लाेक इएमआयवर वस्तू खरेदी करतात, असे मानले जाते. मात्र, याबाबतीत ग्रामीण भागातील लाेकांची संख्या शहरी नागरिकांच्या तुलनेत जास्त आहे.
देशात प्रति एक लाख लाेकांमागे १८,३२२ जण कर्जबाजारी आहेत, अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या व्यापक वार्षिक माॅड्यूलर सर्वेक्षणात (कॅम्स) आढळली आहे. इएमआयवर खरेदी करण्याचे शहरी भागातील प्रमाण १७.४४ टक्के आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण १८.७ टक्के आहे. संस्थात्मक, बिगर संस्थात्मक कर्ज घेणाऱ्यांचा या आकडेवारीत समावेश केला आहे. ग्रामीण भागात खरेदी ६ टक्क्यांनी वाढली आहे. शहरी भागात हे प्रमाण २.८ टक्के एवढे आहे. ग्रामीण भागात वस्तू खरेदीचा कल वाढला आहे.
मासिक खर्चात माेठी वाढ
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने सादर केलेल्या अहवालानुसार, ग्रामीण भागात कुटुंबाचा मासिक खर्च १० वर्षांमध्ये १६४ टक्के तर शहरात १४६ टक्के वाढला आहे. ग्रामीण भागात माेठी वाढ झाली आहे. यामागील कारण म्हणजे, ग्रामीण भागात शहरी जीवनशैलीचे अनुकरण केले जात आहे. त्यासाठी इएमआयवर महागड्या वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच गावांमध्ये कर्जबाजारी लाेकांची संख्या वाढली आहे.
शेतकऱ्याची कमाई घटली, खर्च वाढले : शेतकऱ्यांचे दरराेजचे उत्पन्न बरेच घटले आहे. सरकारच्या उच्च स्तरिय समितीने सर्वाेच्च न्यायालयात नुकताच एक अहवाल सादर केला हाेता. त्यासाठी २०१८-१९च्या सर्वेक्षणाचा आधार घेतला आहे. त्यातुलनेत खर्च बराच वाढला आहे.
ग्रामीण महिलादेखील कर्ज घेण्यात आघाडीवर ग्रामीण भागातील महिलाचे कर्ज घेण्याचे प्रमाण शहरी महिलांपेक्षा जास्त आहे. प्रति एक लाख महिलांमध्ये ग्रामीण भागात हे प्रमाण १३ टक्के आहे. तर शहरी भागात हा आडा १० टक्के आहे.
१३,०१६ ग्रामीण महिला कर्जबाजारी आहेत.
१०,५८४ शहरी महिलांवर कर्ज आहे.
२४,३२२ ग्रामीण पुरुषांनी कर्ज घेतले आहे.
२३,९७५ शहरी पुरुष कर्जबाजारी आहेत.