चेन्नई : येथील आयटी कंपनी आयडिया२आयटी या कंपनीने सलग १० वर्षे सेवा देणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांना कार भेट देण्याची घोषणा केली आहे. आयडिया२आयटीची ही अनोखी भेट देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. कंपनीच्या कठीण काळात सोबत केल्याबद्दल कंपनीकडून ही भेट कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
आयडिया२आयटी कंपनीचे मार्केटिंग प्रमुख हरि सुब्रमण्यम यांनी सांगितले की, कंपनीने जी संपत्ती तयार केली आहे, तिच्यावर कर्मचाऱ्यांचाही अधिकार आहे, असे आमचे मत आहे. आमच्या कंपनीत ५००पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. त्यातील १०० कर्मचारी मागील १० वर्षांपासून कंपनीसोबत आहेत. त्यांना मारुती सुझुकी कंपनीची कार भेट देण्यात आली आहे. कंपनीचे संस्थापक व चेअरमन मुरली विवेकानंद यांनी सांगितले की, या कर्मचाऱ्यांच्या साह्यानेच कंपनी आजच्या टप्प्यावर पोहोचली आहे. वास्तविक कंपनी त्यांना गाड्या देत आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. या कर्मचाऱ्यांनीच कठोर परिश्रम आणि समर्पण याच्या बळावर हे कमावले आहे. जो आपले लक्ष्य प्राप्त करतो, तो यशाचा स्वाद चाखणारच. कार भेट देणे, हे या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठे काही तरी करण्याची आमची योजना आहे.
आणखी एका कंपनीने वाटल्या बीएमडब्ल्यू
- आयडिया२आयटी ही कंपनी याआधीही आपल्या अनोख्या भेटवस्तूंमुळे चर्चेत आली आहे. वेगवेगळ्या सणांच्या वेळी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आयफोन, सोन्याची नाणी व इतर महागड्या भेटवस्तू दिलेल्या आहेत.
- कार मात्र पहिल्यांदाच दिली जात आहे. चेन्नईतील आयटी कंपनी किसफ्लो आयएनसीनेही नुकत्याच आपल्या ५ कर्मचाऱ्यांना बीएमडब्ल्यू कार भेट दिल्या होत्या. त्यातील एका कारची किंमत एक कोटी रुपये आहे. कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना या कार देण्यात आल्या आहेत.